रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

मान्सूनचा कृपावर्षाव

गावाबाहेर माळरानांवर पडलेल्या चारा छावण्या, भर उन्हात चारा आणि पाण्यासाठी तासंतास रांगेत थांबलेले शेतकरी आणि शाळा सोडून चारा छावण्यांवरच मुक्काम ठोकलेल्या माणदेशी मुलांना पाहून गेल्या वर्षीच्या दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष अनुभवता येत होती. २०१२ च्या जून ते सप्टेंबर दरम्यान न बरसलेल्या मान्सूनचे परिणाम त्यानंतर नऊ महिन्यांनी यंदाच्या मान्सूनच्या आगमनापूर्वी चरणसीमेवर पोचले होते. चारा छावण्यांवर शेतकऱ्यांच्या मुलाखती घेताना त्यांच्या डोळ्यातील अश्रु आणि शब्दांमधून व्यक्त होणारी हतबलता आणि नैराश्य हेही मान्सूनचे थेट परिणाम म्हणावे लागतील. राज्यात इतरत्रही काही वेगळी परिस्थिती नव्हती. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला होता. खरीप तर हाती लागले नव्हतेच, पाणीसाठे नसल्याने रब्बीही झाले नव्हते. पिण्याच्या पाण्यासाठी आठवड्यातून एकदा येणाऱ्या टैन्करवर उडणारी झुंबड आणि मिळेल तितक्या चाऱ्यावर जनावरांना किमान जगवण्याची धडपड हे चित्र सार्वत्रिक झालेले. शहरांमध्येही पाणीकपात आणि रस्त्यारस्त्यावर दिसणारे टैन्कर गेल्या वर्षी रुसलेल्या मान्सूनची कथा सांगत होते. 

मात्र, यंदाचा जून जसा उजाडला तसे हे चित्र एकाएकी पालटू लागले. तळाला गेलेले पाणीसाठे पुन्हा भरू लागले. दोन वर्षांनी पेरण्या उत्तम झाल्या. चाऱ्याची चिंता मिटली. टैन्करची संख्या कमी कमी होत गेली. महिन्याभरातच राज्यातील बहुतेक सर्व जलाशय भरभरून वाहू लागले. गेल्या वर्षी दुष्काळ दाखवलेल्या मान्सूनने यंदा आपली कृपादृष्टी दाखवत राज्यावर सरासरीपेक्षा जास्त वर्षाव केला. मान्सूनमध्ये चढ-उतार येत असले तरी, अंतिमतः तो संतुलन राखत असतो याचा प्रत्यय यंदाच्या मान्सूनने पुन्हा दिला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) नोंदींनुसार एक जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा हंगाम मानला जातो. या हंगामासाठी आयएमडीने मान्सूनच्या दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. यंदा या हंगामात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पर्जन्यमानाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांतील हा सर्वोत्तम मान्सून मानला जात आहे.

यंदाच्या मान्सूनची वैशिष्ट्ये  
एक जून रोजी केरळात दाखल झालेला मान्सून हा आगमनाच्या वेळीच 'निराळा' असल्याचे तज्ञांच्या लक्षात आले. सर्वसाधारण कालावधीच्या एक महिना आधीच केवळ १६ दिवसांत संपूर्ण भारत व्यापून आपण यंदा 'सुपरफास्ट' खेळी करणार असल्याचे 'ओपनिंग'लाच दाखवून दिले. त्यानंतरही सलग १६ आठवडे त्याने आपला 'रेन रेट' सरासरीच्यावर ठेवून ऐतिहासिक कामगिरी बजावली. एखादा 'व्हाईट वॉश' मिळाल्यावर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या संघाने पुढच्या सामन्यात धावांचा वर्षाव करून नवा उच्चांक नोंदवण्यासारखीच ही स्थिती म्हणावी लागेल. गेल्या वर्षी देशभरात हंगामात सरासरीपेक्षा ७ टक्के कमी पाऊस झाला होता. देशाच्या ३६ हवामानशास्त्रीय विभागांपैकी १३ विभागांमध्ये दुष्काळी स्थिती होती. २२ विभागांमध्ये पावसाने जेमतेम सरासरी गाठली होती. तर, फक्त एका विभागात पाऊस सरासरीपेक्षा जास्त नोंदला गेला होता. यंदा मात्र हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. यंदा देशभरात दीर्घकालीन सरासरीपेक्षा ६ टक्के पाऊस जास्त झाला असून, ३६ पैकी ६ विभागांमध्ये तो सरासरीपेक्षा खाली आहे (ज्यांपैकी ३ विभाग हे ईशान्येकडील आहेत जिथे पावसाचे प्रमाण प्रचंड असते) म्हणजे बिहार, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या तीनच विभागांत दुष्काळी स्थिती आहे. आणि अद्याप मान्सून परतलेला नाही त्यामुळे ही परिस्थितीही काही प्रमाणात बदलू शकते. यंदा १४ विभागांत पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे (गेल्या वर्षी फक्त एका), तर १६ विभागांत त्याने सरासरी गाठलेली आहे. सलग दोन वर्षांत दोन भिन्न प्रकारचे मान्सून देशाने अनुभवले. 
राज्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. गेल्या वर्षी कोकण विभागात हंगामात सरासरीपेक्षा तीन टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात २५ टक्के कमी, मराठवाड्यात ३३ टक्के कमी तर विदर्भात सरासरीपेक्षा ८ टक्के पाऊस जास्त झाला होता. यंदा कोकणात हंगामातील सरासरीपेक्षा २० टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात २१ टक्के जास्त, मराठवाड्यात ९ टक्के जास्त, तर विदर्भात तब्बल ४३ टक्के जास्त पाऊस झाला आहे. २०१२ च्या दुष्काळी स्थितीतून राज्याला पूर्णपणे बाहेर काढण्याचे काम यंदाच्या मान्सूनने केले असल्याचे किमान आकडेवारीवरून तरी दिसून येत आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. एल. एस. राठोड यांच्या म्हणण्यानुसार, 'मान्सूनचे वेळेत झालेले आगमन, आगमनापासून शेवटपर्यंत पावसामध्ये राहिलेले सातत्य, 'ड्राय स्पेल'चे कमी प्रमाण आणि त्यांचा कमी कालावधी ही यंदाच्या मान्सूनची वैशिष्ट्ये म्हणता येतील. देशाच्या बहुतेक भागांत आता पाण्याचे दुर्भिक्ष्य संपलेले असून, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे खरीपाप्रमाणेच रब्बीचेही बम्पर पिक यंदा अपेक्षित आहे. सर्व जलाशय भरलेले असल्यामुळे पिण्यासाठी, उद्योगांसाठीही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.'
मात्र, यंदा पावसाने काही ठिकाणी कहरही केला. उत्तराखंडमधील दुर्घटनेसाठीही यंदाचा मान्सून ओळखला जाईल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि नुकत्याच गुजरातमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. काही राज्यांमध्ये जास्त पावसामुळेही पिकांचे मोठे नुकसान झाले (महाराष्ट्रात विदर्भात). मात्र, गेल्या वर्षीच्या दुष्काळी स्थितीकडे पाहता यंदाचा मान्सून कृपावर्षाव करणाराच ठरला असे म्हणता येईल. 

हवामानशास्त्रीय स्थिती 
गेल्या वर्षी जूनमध्ये प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या 'एल निनो' स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहांमध्ये अडथळा निर्माण होऊन बंगालच्या उपसागरातील आणि हिंदी महासागरावरील बाष्प पूर्वेकडे खेचले गेले होते. परिणामी देशभरात जून कोरडा गेला. त्यामुळे निर्माण झालेली स्थिती सबंध हंगामात पूर्ववत होऊ शकली नाही. परिणामी देशातील १३ विभागांना (महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा) दुष्काळाला सामोरे जावे लागले. यंदा मात्र सबंध हंगामात एल निनो स्थितीचा अभाव असल्यामुळे मान्सूनचे वारे विनाअडथळा प्रवाहीत राहिले. त्याचप्रमाणे हंगामाच्या सुरुवातीपासूनच अखेरपर्यंत बंगालच्या उपसागरात नियमितपणे कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्याने पावसात सातत्य राहिले. आंध्र प्रदेश आणि ओडिशादरम्यान मध्य- वायव्य बंगालच्या उपसागरात बहुतेक कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन ती विदर्भावरून मध्य प्रदेश आणि नंतर गुजरात, राजस्थानकडे सरकल्यामुळे महाराष्ट्राला या स्थितीचा मोठा फायदा झाला (या ठिकाणी मान्सून काळात वातावरणाच्या वरच्या थरातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली). दुसरीकडे अरबी समुद्रात मान्सून काळात पश्चिम किनारपट्टीला समांतर असणारा कमी दाबाचा पट्टा (ऑफ शोअर ट्रफ) सलग अडीच महिने सक्रिय राहिल्याने त्याचाही फायदा चांगल्या पावसाच्या रूपाने गुजरातपासून केरळ किनारपट्टीला झाला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा