रविवार, २६ मे, २०१३

माणदेशी पाऊस: मॉन्सून डायरी (२४ मे दुपारी २ ते रात्री २)

'तो' नक्की येईल.. पण कधी?  

मॉन्सूनपूर्व वातावरण म्हणजे सहनशक्तीची परिसीमा ! दिवसाचे किमान तापमान जसे अगदी सूर्योदयाच्या आधी नोंदले जाते, तसेच मॉन्सूनच्या आगमनाच्या आधी दाह चरणसीमेला पोचलेला असतो. सूर्योदय झाल्या झाल्या जसा वातावरणात एकाएकी बदल होतो, तसाच मॉन्सूनच्या आगमनानेही होतो. सूर्योदयाची वेळ निश्चित असते. मॉन्सून मात्र बेभरवशी! आपल्या भागात तो नेमकी कोणत्या तारखेला येईल याचा काही नेम नसतो. इतकेच काय, देशाच्या काही भागांत तर तो कोणत्या वर्षी बरसेल याचीही खात्री नसते. अशाच भागांपैकी असणारा महाराष्ट्रातला माणदेश गेली तीन वर्षे मॉन्सूनची वाट पाहत आहे. त्याच्या सहनशक्तीचा कालावधी राज्याच्या इतर भागांसारखा तीन- चार महिन्यांचा नाही, तर तब्बल तीन वर्षांचा आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवशी परिस्थितीची दाहकता आपली परिसीमा विस्तारत आहे. वातावरणातील तापमान, आर्द्रता, वाऱ्यांची जागा अस्वस्थता, नैराश्य, चीड, वेदना, कष्टाने घेतली आहे. या घटकांच्या दाहकतेनी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आकाशात पुसटसे आशेचे ढग जमू लागले आहेत. मात्र ते कधी बरसणार याकडे हजारो डोळे टक लावून पाहत आहेत. 



२४ मे दुपारी २ (पुसेगाव छावणी)

सातारा, कोरेगावमार्गे आमच्या गाड्या म्हसवडच्या दिशेने धावत होत्या. आजूबाजूला दिसणारा ऊस आणि हिरवीगार झाडे पाहून आपण नक्की दुष्काळी भागाकडेच जातोयना असा प्रश्न पडला. सर्वात पुढच्या गाडीत स्टुर्ला गुनार्सन, मी आणि हरीश कुलकर्णी आणि मागच्या दोन गाड्यांमध्ये त्यांचे चार सहकारी. स्टुर्लांचे प्रश्न पुण्यापासून अखंड सुरु होते. या भागात पाऊस कमी का, सामाजिक परिस्थिती काय, किती जणांनी स्थलांतर केले असेल, कोणत्या घटकांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला असेल, प्रोजेक्ट मेघदूतसाठी या भागातून तुम्ही काय अभ्यासणार आहात.. गप्पा सुरु असतानाच वर्धनगडाचा घाट ओलांडला आणि मी म्हटले, आता इथून पुढे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. 

गाडी पुसेगावात शिरली. दुपार असूनही बाजारात गर्दी होती. सर्व व्यवहार व्यवस्थित सुरु होते. रिक्षांमधून कुमार सानू आणि हिमेशची गाणी, दुपारच्या उन्हात अधिक भडक वाटणारे लाल, पिवळे, जांभळे रंग, आजूबाजूला गाड्यांवर ताजी फळे, भजी, कोल्डड्रिंक.. आणि या सर्व गर्दीत उठून दिसणारे 'गर्दी'चे फ्लेक्स. मात्र, या फ्लेक्सवर सध्या वाढदिवस किंवा बाजारसमितीवरील निवडीच्या शुभेच्छांऐवजी दुष्काळी स्थितीत केलेल्या कामांची यादी. बाजार ओलांडून गाड्या थोड्याच पुढे सरकल्या आणि डावीकडे एका कुंपणामध्ये हिरव्या पालांखाली जनावरांची गर्दी दिसली. छावणीच्या आवारात प्रवेश केल्या केल्या शेतकऱ्यांसाठी चारा आणि पाणी वाटपाच्या सूचना देणारा फलक वाचत असतानाच आमच्या बाजूला गर्दी जमा झाली. तीन फॉंरेनर्स, त्यांच्या हातातील कॅमेरे, माईक पाहून चारा वाटपात बिझी असणारा व्यवस्थापकही आमच्या दिशेने धावत आला. 



स्थानिक सेवागिरी सहकारी पतसंस्थेच्या पुढाकाराने मार्चमध्ये सुरु झालेल्या या छावणीत २६५ कार्ड धारकांची १२३० जनावरे आहेत. शासनातर्फे छावणीतील प्रत्येक जनावराच्या चारा - पाण्यासाठी दिवसाला ७० रुपये खर्च दिला जातो. चारा वाटप, पाण्याच्या टैन्करचे नियोजन करण्याची जबाबदारी पतसंस्थेकडे असते. आम्ही पोचलो तेव्हा शेतकरी रांगेने कार्ड दाखवून आपल्या जनावरांच्या वाटणीचा चारा ताब्यात घेत होते. गणेश वाघ आणि शरद जाधव यांची या ठिकाणी चार चार जनावरे आहेत. छावणीत जनावरे घेऊन राहणारा माणदेशी शेतकरी परिस्थितीचे पूर्ण आकलन असणारा, दुष्काळी अपरिहार्हतेत व्यावहारिक निर्णय घेणारा, पण तरीही हळवेपण जपलेला जाणवला. वाघ आणि जाधव या दोघांशी बोलताना येथील शेतकऱ्यांना आपल्या भागाची भौगोलिक आणि हवामानाची स्थिती, दुष्काळामागील कारणे, त्यावरील उपाय आणि सरकारी योजनांची इत्थंबूत माहिती असल्याचे दिसून आले. गेली दोन वर्षे या भागात पाऊस झालेलाच नाही. यंदाच्या मार्चमध्ये ज्यावेळी परिस्थिती अतिशय बिकट झाली तेव्हा ही छावणी सुरु झाली. आसपासच्या पाच एक किलोमीटरच्या परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे या ठिकाणी जगत आहेत. पाऊस नसल्यामुळे शेती नाही. शेती नाही म्हणून उत्पन्न फक्त जनावरांवर आधारीत. अशा स्थितीत चारा आणि पाण्यावाचून जनावरे गेली, तर पोटाचा आहे तो आधारही संपणार. छावण्यांमुळे जनावरे जगण्याची शाश्वती मिळाली. कुटुंबातील एकाला तरी सतत आपल्या जनावरांसोबत छावणीत राहावे लागते. दुष्काळी स्थितीत शेतकरी जनावराला जगवण्यासाठी आटापिटा करतो. तेव्हा जनावर शेतकऱ्याला जगवते!

आमचा पावसाळा वेगळा आहे!

पावसाबद्दल जाधव बोलू लागले.. "माणदेशात मॉन्सूनच्या पावसाचा भरवसा नसतोच. आम्हाला उन्हाळी पाऊस हवा. तो पाऊस जोराचा असतो. जमिन शांत होते. पेरणीसाठी असा एक तरी पाऊस हवाच. अशा पावसानेच तलाव, धरणे भरतात, पिण्याच्या पाण्याची सोय होते. मृगाच्या आधी रोहिणी नक्षत्रात माणदेशात असा पाऊस पडतो. मात्र गेली तीन वर्षे असा पाऊस झालाच नाही. आणि आत्ताचा दुष्काळ त्यामुळे आहे. हा पाऊस झाला नाही, तर थेट परतीच्या मॉन्सून पासूनच थोडी काय ती अशा. पावसाळ्यातील कोकण, पुण्या- मुंबईचे ढग आमच्यापर्यंत पोचत नाहीत. आमचा पावसाळा तुमच्यापेक्षा वेगळा आहे."


जो दुष्काळी भाग आहे, लोक अशा ठिकाणी जाऊन राहतातच का? गेले अनेक दिवस हा प्रश्न मनाला सतावत होता. 'आमचा पावसाळा तुमच्यापेक्षा वेगळा आहे' या एका वाक्याने मला त्याचे उत्तर मिळाले. माणदेशातील शेतकऱ्यांना येथील हवामानाची उत्तम जाण आहे. पाऊस कमी असला, तरी त्याचे चक्र ओळखून त्याने आपले नियोजन केले आहे, स्वतःला या चक्राशी जुळवून घेतले आहे. मात्र ते चक्रच जेव्हा पालटू लागले, तेव्हा शेतकरी हवालदिल झाला. तो वाट पाहतोय.. हे चक्र पुन्हा सुरळीत कधी होईल याची. पण कधी होईल?.. होईल की नाही?

संध्याकाळी ६ (पिंपरी छावणी) 

पुसेगाव छावणीचा पाहुणचार घेऊन आम्ही वेगाने म्हसवडच्या दिशेने निघालो. म्हसवडला सध्याच्या हंगामातील सर्वात जुनी आणि मोठी छावणी असल्यामुळे तेथील शूटिंग फिल्मसाठी महत्वाचे होते. मात्र, सूर्य क्षितिजाजवळ आल्यामुळे वाटेत एका उंचवट्यावर दिसणाऱ्या पिंपरी छावणीकडे गाड्या वळवल्या. मावळतीला आलेल्या सूर्याचा नारिंगी प्रकाश, गायींचे हंबरणे, दूध काढण्याची तयारी, पेटलेल्या चुली आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यातून धूर, शेणाचा एकत्रित गंध. बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून सिनेमाटोग्राफर हरमान आणि त्यांचा सहकारी ड्यानिअल हे दृश्य टिपू लागले. आपल्या पक्क्या घरांपासून, शेतापासून दूर असले, तरी तोच दिनक्रम, तीच लगबग, तोच संवाद.. गावाबाहेरचा हा गाव तितकाच जिवंत. शेवटी माणसे तीच.. पाण्याअभावी अस्थायी विश्व वसवलेली.



फोटो घेता घेता एका आजोबांना विचारले, यंदा काय अंदाज आहे पावसाचा? हातातले काम सुरु ठेवत ते म्हणाले, 'यंदाही काही नेम नाही. आज रोहिण्या लागल्या.. म्रीगापर्यंत काही पडलं तर नशीब (२४ मे ते ७ जून- पूर्व मोसमी सरी). नाहीतर अवघड आहे. वारा बघा कसा वाहतोय. उन्हाळ्यातही रात्री अंगावर चादर घेऊन झोपावं लागतंय. असंच राहिलं तर कसा पाऊस पडणार? चांगलं आठवडाभर तापायला हवं. मग बघा कसं येतं भरून.' आजोबांनी गप्पा मारता मारता मला 'थंडर शॉवर्स'च हवामानशास्त्रच सांगितलं. या भागासाठी मॉन्सूनच्या पावसापेक्षा थंडर शॉवर्स कसे महत्वाचे आहेत हे पटवणारे हे दुसरे उदाहरण!



गोंदवल्याचा साहील लॉज, 'मॉन्सून' आणि 'सायन्स फिक्शन' !
  
म्हसवडला पहाटेच्या अंधारात शूटिंग करण्याचे निश्चित करून रात्री आम्ही गोंदवल्यात मुक्काम केला. पुण्यात हॉटेल प्राईडमध्ये उतरलेले हे हॉलीवूडचे फिल्ममेकर गोंदवल्यात एका कामचालाऊ लॉजवर कसे राहतील, असा गंभीर प्रश्न आम्हाला पडला होता. मात्र, दहा बाय दहाच्या कोंदट रूममध्ये मळकट गादीवर पाय पसरून स्टुर्ला लैपटॉपवर फोटो ट्रान्सफर करू लागले, तेव्हा हायसे वाटले आणि आश्चर्यही. दिवसभर उन्हात काम करूनही स्टुर्लांच्या गप्पा सुरूच होत्या. मी विचारले, फिल्मचे नाव निश्चित झाले आहे का? ते म्हणाले हो. 'मॉन्सून' !.. हेच योग्य आणि समर्पक नाव आहे. शिवाय याआधी कोणी वापरलेलेही नाही. "तू 'मॉन्सून'चा प्रोमो बघितलाय का?" त्यांनी विचारले. मी नाही म्हणताच त्यांनी जे काही दाखवले त्याने अंगावर शहारेच आले. आपण या फिल्मचा भाग असणार आहोत याची कल्पनाही करणे शक्य नव्हते. मन औत्सुक्य, अभिमान, आनंदाने भरून आले. स्टुर्ला त्यांचे एक एक फोल्डर ओपन करून दाखवू लागले, तसा नर्व्हसनेस वाढू लागला. आपण इतक्या मोठ्या फिल्ममेकर सोबत इतक्या सहजतेनी वावरतोय. पण आपल्या मोठेपणाची किंचितही जाणीव करून न देता ते आमच्यातलेच एक होऊन वावरतायत.. हे पण त्यांच्या मोठेपणाचेच एक दर्शन. दोन तासाच्या विश्रांतीआधी त्यांनी त्यांच्या आगामी 'सायन्स फिक्शन'चे रफ एडिटिंग दाखवले. हॉलीवूड बॉलिवूडच्या किती पुढे आहे आणि कायमच ते बॉलिवूडचे 'प्रेरणास्थान' का आहे याचा अंदाज ते फुटेज पाहून आला. दुसऱ्या दिवशी दिवसभर मी आणि हरीश रात्रीचे ते दृश्य आठवून हसत होतो. उद्या ही सायन्स फिक्शन फिल्म पडद्यावर झळकेल, तेव्हा कोणाला सांगितलं तरी खरे वाटेल का, याच्या दिग्दर्शकाने या फिल्मचे नॉन एडिटेड फुटेज आम्हाला गोंदवल्याच्या साहील लॉजच्या एका दहा बाय दहाच्या नॉनएसी खोलीत रात्री जागून दाखवले. आत्ता हे लिहितानाही हसू येतंय !

स्टुर्ला गुनार्सन यांच्या आगामी 'मॉन्सून' या फिल्मचा 'प्रोमो' ! http://www.youtube.com/watch?v=7Nvp_YXWUL8

गुरुवार, २३ मे, २०१३

माणदेशाच्या वाटेवर (२४ मे २०१३, सकाळी ८:३०)


उत्तर, मध्य भारतात उष्णतेची लाट, दक्षिण भारतात पूर्वमोसमी सरी आणि अंदमानमधून जोरदार पावसाच्या येणाऱ्या बातम्या.. मॉन्सूनच्या आगमनापूर्वीच्या हवामानाचे हे टिपिकल चित्र ! देशाचा बहुतांश भाग उष्णतेने होरपळत असला, तरी त्यातून मॉन्सूनचे आगमन समोर दिसत असल्यामुळे हे चटकेही दिलासादायक वाटत आहेत. १७ मे ला मॉन्सूनच्या अंदमानातील आगमनाची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून आठवडाभर तो अंदमानच्या समुद्रातच रेंगाळला आहे. अंदमानच्या पुढे मॉन्सूनचा मुक्काम हललेला नसला, तरी ज्या भागात तो पोचला आहे, तेथील त्याचा जोर ही गोष्ट मात्र यंदा नक्कीच आश्वासक आहे. गेल्या वर्षी अगदी अंदमान पासूनच काहीतरी चुकत असल्याची जाणीव मॉन्सूनच्या धारांनी करून दिली होती. महासेन चक्रीवादळामुळे निर्माण झालेली प्रतिकूल स्थिती आता सुरळीत झाली असून, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाहही अपेक्षेप्रमाणे निर्माण झाल्याचे हवामानतज्ञ सांगत आहेत. आता फक्त हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरात अपेक्षित दाब निर्माण निर्माण झाला की, मॉन्सूनचा पुढचा प्रवास सुरु होऊ शकेल. 

प्रोजेक्ट मेघदूतचे हे तिसरे वर्ष आणि मॉन्सून डायरीचेही. मॉन्सून सोबतच्या प्रवासात येणारे अनुभव आपल्यासोबत लाईव्ह शेअर करण्यासाठी मॉन्सून डायरी लिहावी असा विचार पहिल्या प्रवासाच्या आधी आला होता. आणि डायरीच्या प्रत्येक पानाला आपल्याकडून मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे डायरी रोजच्या रोज अपडेट करण्याचा उत्साह कायम राहिला. यंदाही मॉन्सून डायरी लिहीत आहे. सध्याची महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि त्याच्या पार्श्वभूमीवर निसर्गाकडून आणि समाजाकडून होणारे मॉन्सूनचे स्वागत अनुभवण्यासाठी प्रोजेक्ट मेघदूतची टीम खूप आतुर आहे. हा सोहळा मॉन्सून डायरीमधून आपल्याला रोजच्या रोज वाचता येईल, अनुभवता येईल. 

प्रोजेक्ट मेघदूतच्या तिसऱ्या सिझनची आज सुरुवात होत आहे. माणदेशातील मॉन्सूनपूर्व दुष्काळी परिस्थिती अभ्यासण्यासाठी पुण्यातून सात जण रवाना होत आहेत. मॉन्सूनच्या आगमनानंतर पुन्हा याच भागाला भेट देऊन मॉन्सूनमुळे झालेले बदलही टिपण्यात येणार आहेत. यावेळी प्रोजेक्ट मेघदूतचा प्रवास विशेष आहे. जागतिक ख्यातीचे फिल्ममेकर स्टूर्ला गुनार्सन यंदा प्रोजेक्ट मेघदूतसोबत मॉन्सूनचा पाठलाग करणार आहेत. मॉन्सून प्रमाणेच त्यांच्यासोबतचे अनुभवही मॉन्सून डायरीतून आपल्या समोर येतील.