सोमवार, ४ एप्रिल, २०१६

प्रोजेक्ट मेघदूत काय आहे, मॉन्सूनचा पाठलाग कसा करण्यात येत आहे, पाच वर्षांत ५० हजार किलोमीटरच्या शोधमोहिमेतून कोणती माहिती समोर आली.. पाहा - स्वयं मध्ये 'प्रोजेक्ट मेघदूत'



रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३

पायलीन: आव्हानांचे 'महावादळ'

'पायलीन' या अतितीव्र चक्रीवादळाचा प्रभाव (व्हेरी सिवेर सायक्लोन) ओसरून त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाले आहे. दरम्यानच्या काळात ओडीशाच्या गोपालपूरजवळील त्याच्या जमिनीवरील आगमनापासून ते छत्तीसगड- झारखंडपर्यंतच्या बारा तासांच्या प्रवासादरम्यान त्याने आपल्या रौद्र रूपाचा परिचय जगाला करून दिला आहे. भारतीय किनारपट्टीला धडकणाऱ्या चक्रीवादळांपेक्षा या वादळाची तीव्रता दुप्पटीपेक्षा अधिक असल्यामुळे त्यामुळे होऊ शकणारे नुकसानही त्याच प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. भारतासाठी 'हरिकेन' किंवा 'टायफून'सारखी महाचक्रीवादळे (सुपर सायक्लोन) ही खूपच दुर्मिळ असतात. पायलीन हे चक्रीवादळ 'सुपर सायक्लोन'ची पातळी गाठू शकणार असल्यामुळे त्याचा फटका बसणारे किनारपट्टीवरील नागरिक, आपत्ती निवारण करणारे प्रशासन आणि चक्रीवादळातील घडामोडींवर निरंतर लक्ष ठेवून अंदाज वर्तवणाऱ्या हवामानशास्त्रीय संस्थांसाठी 'पायलीन' हे आव्हानांचे वादळच ठरणार आहे.

भारतीय उपखंडातील चक्रीवादळांची निर्मिती  

भारतीय उपखंडाचे पावसाळ्यातील हवामान हे मुख्यतः विषुववृत्ताजवळील हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि काही प्रमाणात अरबी समुद्रात घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असते. उत्तर गोलार्धात सूर्याचा आकाशातील प्रवास हा २१ मार्च ते २२ सप्टेंबर (या दोन दिवशी सूर्य विषुववृत्तावर असतो) या कालावधीत होतो. २१ जून रोजी सूर्य उत्तर गोलार्धातील आपली परिसीमा गाठतो (२३.५ अंश- कर्कवृत्त). या वेळी उत्तर गोलार्धात उन्हाळ्याने उच्चांक गाठलेला असतो. या कालावधीत भारतीय उपखंड आणि लगतच्या समुद्रावर सूर्याची किरणे अधिकाधिक लंबरूप पडल्यामुळे भारताला मान्सून अनुभवायला मिळतो (समुद्र आणि जमिनीतील दाबाच्या फरकामुळे समुद्रावरून बाष्पयुक्त वारे भूप्रदेशात वाहू लागतात). सूर्याचा दक्षिण दिशेने विषुववृत्ताजवळून प्रवास होत असताना (सप्टेंबरनंतर) त्या भागातील समुद्रपृष्ठाचे तापमान वाढून कमी दाबाची क्षेत्रे (१ हेक्टो पास्कल- दाबाच्या फरकाचे एकक) निर्माण होऊ लागतात. कमी दाबाच्या क्षेत्रात रिकामी झालेली जागा बाजूच्या जास्त दाबातील हवा भरून काढण्याचा प्रयत्न करते. पृथ्वीच्या परिवलानामुळे त्या हवेला वक्राकार गती प्राप्त होते आणि कमी दाबाभोवती वारे चक्राकार गतीने फिरू लागतात (उत्तर गोलार्धात त्यांची फिरण्याची दिशा ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने). चक्राकार गती आणि कमी दाब यांच्या प्रभावामुळे उबदार समुद्राकडून मिळणारे बाष्प त्या क्षेत्रामध्ये वातावरणात वर वर सरकू लागते. या बाष्पाने १२ ते १५ किलोमीटरची उंची गाठली की त्याचे दवबिंदूत रुपांतर होते (कंडेन्सेशन). या प्रक्रियेत मुक्त होणारी ऊर्जा कमी दाबाच्या क्षेत्राला प्राप्त होते आणि त्याचे स्वरूप आणखी विस्तारू लागते. 

ही प्रक्रिया जितकी जास्त काळ चालेल तितके हे क्षेत्र आणखी तीव्र होऊन चक्रीवादळाचे रूप धारण करते. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याच्या मध्य भागातील दाब ४.५ ते ८.५ हेक्टोपास्कल इतका खाली उतरतो. तर त्याच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांची गती ताशी ६० ते ९० किलोमीटर इतकी होते. वादळ जर अधिक काळ समुद्रावर राहिले तर दाब आणखी कमी होत जातो, वाऱ्यांचा वेग आणखी वाढतो आणि चक्री वादळाचा घेरा शेकडो किलोमीटर पर्यंत पसरतो. 'सुपर सायक्लोन'मध्ये तर दाब ६५ हेक्टोपास्कल इतका खाली उतरतो, तर केंद्राभोवती फिरणारे वारे ताशी २५० किलोमीटरचा वेग गाठतात आणि या महाचक्रीवादळाचा घेरा तब्बल दोन हजार किलोमीटरपर्यंत विस्तारतो. (प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या अशा महाचक्रीवादळांना टायफून, तर अटलांटिक महासागरात निर्माण होणाऱ्या महाचक्री वादळांना हरिकेन म्हणतात.)  
  
याच काळात चक्रीवादळाच्या मधोमध ऊर्ध्वगामी बलामुळे (सेंट्रीफ्युजल फोर्स) मोकळी गोलाकार जागा निर्माण होते ज्याला 'सायक्लोन आय' (चक्रीवादळाचा डोळा) म्हणतात. त्याचा आकार साधारणपणे ३० ते ६० किलोमीटर इतका असतो. या 'आय' मध्ये वातावरण अगदी स्वच्छ असते (अगदी दिवसा निरभ्र आकाश, तर रात्री तारे पाहता येऊ शकतील इतकी) आणि तेथील तापमान बाजूच्या वातावरणाच्या तुलनेत आठ ते दहा अंशांनी अधिक असते. 'सायक्लोन आय'च्या भोवती अतिशय वेगवान वाऱ्यांची आणि ढगांची फिरती भिंत असते, जिला 'आयवॉल' म्हणतात. चक्रीवादळामुळे होणारे सर्वाधिक नुकसान या 'आयवॉल'मुळेच होत असते. वाऱ्यांचा प्रचंड वेग (ताशी ९० ते २५०) आणि प्रचंड पाऊस (चोवीस तासांत ५०० मिलीमीटरपेक्षा अधिक) यांमुळे या फिरत्या भिंतीची धडक ही प्रलय घडवून आणते. या भिंतीच्या बाहेर चक्रीवादळाला ढगांनी बनलेल्या काही शाखाही असतात. त्यांची घनता केंद्रापासून बाहेरील भागात कमी कमी होत जाते. त्यांच्या घनतेप्रमाणे त्या त्या भागात पावसाचे प्रमाण कमी जास्त असते.        

मान्सून आणि चक्रीवादळ 
मान्सून काळात कमी दाबाची क्षेत्रे आणि तीव्र कमी दाबाची क्षेत्रे (डिप्रेशन) अगदी मान्सूनच्या सुरुवातीपासूनच म्हणजे जूनपासूनच निर्माण होऊ लागतात. मात्र त्यांची निर्मिती ही बंगालच्या उपसागराच्या मध्यापासून उत्तरेच्या भागात होत असल्यामुळे त्यांचे आयुष्य आठवडाभराचेच राहते. मात्र मान्सूनच्या उत्तरार्धात सूर्याचा विषुववृत्ताजवळून जसा प्रवास होऊ लागतो, तशी या कमी दाबाच्या क्षेत्रांची निर्मिती हिंदी महासागराच्या उत्तर भागात किंवा अंदमानच्या समुद्रात होऊ लागते. अशा कमी दाबाच्या क्षेत्रांना समुद्राकडून जमिनीकडे प्रवास करण्यासाठी तुलनेने अधिक कालावधी मिळाल्यामुळे त्यांची तीव्रता वाढून चक्रीवादळांची निर्मिती होते. म्हणूनच भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा चक्रीवादळांचा कालावधी मानला जातो. मान्सून काळात समुद्रपृष्ठावरून नैऋत्य मोसमी वारे वाहत असल्यामुळे समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरी २६.५ अंश इतके असते. तसेच, या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वर पाच ते बारा किलोमीटर पर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय असतो. या दोन वाऱ्यांच्या प्रवाहाची रचना आणि समुद्र पृष्ठाचे सरासरी २६.५ अंश हे तापमान यांमुळे मान्सून सक्रीय असताना चक्रीवादळांची निर्मिती होऊ शकत नाही. यंदा मात्र तांत्रिकदृष्ट्या मान्सून सक्रीय असताना आणि समुद्रपृष्ठाचे तापमानही सरासरीजवळ असतानाही चक्रीवादळाची आणि त्यातही महाचक्रीवादळाची निर्मिती कशी काय झाली हा प्रश्न सध्या हवामानशास्त्रज्ञांना सतावत आहे. 

भारतात सर्वसाधारणपणे वर्षाला पाच चक्रीवादळे निर्माण होतात (जगभरात ८०). त्या पाचपैकी चार चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागरात, तर एक अरबी समुद्रात निर्माण होते. बंगालच्या उपसागरात अनेकदा प्रशांत महासागराकडून अतिरिक्त बाष्प येत असल्यामुळे त्यांपासून या भागात चक्रीवादळे तुलनेने अधिक निर्माण होतात, तर अरबी समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागाराकडून क्वचितच मिळणाऱ्या अतिरिक्त बाष्पाच्या आधारे तयार होतात. त्याच प्रमाणे अरबी समुद्राच्या पृष्ठाचे तापमान हे बंगालच्या उपसागरापेक्षा कमी असल्यामुळेही तिथे तुलनेने कमी वादळे निर्माण होतात. भारतात तीव्र चक्रीवादळांचा सर्वाधिक तडाखा आंध्र प्रदेशला, तर सर्वसाधारण चक्रीवादळांचा सर्वाधिक तडाखा ओडीशाला बसतो. 

भारतीय उपखंडात १९७० पासून १३ विनाशकारी चक्रीवादळे येऊन गेली ज्यांच्या वाऱ्यांचा वेग ताशी २०० किलोमीटरपेक्षा अधिक होता. १९७० मध्ये बांग्लादेशातील चित्तगोंग मध्ये धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात तीन लाख लोक मृत्युमुखी पडले होते. २९ ऑक्टोबर १९९९ रोजी ओडीशातील पारादीपजवळ धडकलेल्या सुपर सायक्लोन मध्ये १५ हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.                                         
                                                            
'लैंडफॉंल' आणि प्रलय

पूर्णतः विकसित झालेल्या चक्रीवादळाचा घेरा ५०० ते दोन हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला असतो. त्यावेळी केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी दोनशे किलोमीटरचा टप्पाही ओलांडतो. असे चक्रीवादळ दिवसाला ५०० ते ६०० किलोमीटर वेगाने जमिनीकडे सरकत असते. ज्या क्षणाला ते जमिनीला येउन धडकते, त्याला शास्त्रीय भाषेत चक्रीवादळाचा लैंडफॉंल म्हणतात. चक्रीवादळाला समुद्राकडून मिळालेली ऊर्जा ही १०० हायड्रोजन बॉम्बपेक्षा अधिक असते. एवढी प्रचंड ऊर्जा धारण केलेले चक्रीवादळ जमिनीवर येताच तीन प्रकारे विनाश घडवते. चक्रीवादळातून वाहणारे प्रचंड वेगाचे वारे वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना जमीनदोस्त करायला सुरुवात करतात. लहान घरे, झोपड्यांची वाताहत होते, झाडे उन्मळून पडतात, विजेचे, दूरध्वनीचे खांब पडतात, घराची छप्परे उडून जातात, अनेकदा पक्क्या इमारतींच्या भिंतीही कोसळतात. दुसरीकडे प्रचंड बाष्प धारण केलेले ढग मुसळधार कोसळत असतात. अशा ढगांकडून ५०० मिलीमीटर पेक्षाही जास्त (पुण्यातील हंगामातील सरासरीइतका) पाऊस एका दिवसात कोसळतो. यांमुळे अक्षरशः प्रलय येऊन वाटेत येणारे सर्व काही वाहून जाते. चक्रीवादळ तिसरा फटका समुद्राच्या लाटांमार्फत देते. कमी दाब आणि वेगवान वाऱ्यांमुळे 'लैंडफॉंल'दरम्यान समुद्र किनारपट्टीवर पाच मीटर उंचीच्या लाटा उसळू लागतात. यांमुळे सखल भागात किनाऱ्यापासून एक किलोमीटरपर्यंत पाणी आत येते. समुद्राच्या या पाण्याखाली शेती आल्यामुळे शेकडो हेक्टरची जमीन काही काळ नापीक होते. वादळाच्या या तीनही परिणामांचा थेट फटका बसल्यामुळे माणसांची आणि जनावरांची जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. हजारो लोक बेघर होतात, वीज, पाणी, संपर्क यांच्या यंत्रणा कोलमडल्यामुळे अडचणी आणखी वाढतात. वादळानंतर निर्माण होणारे आरोग्याचे, पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे असते. समुद्रावरून जमिनीवर येणारे एक वादळ लाखो लोकांवर थेट परिणाम करते आणि अब्जावधी रुपयांचे नुकसान घडवते.      
जमिनीवर आल्यावर मात्र चक्रीवादळाचा जोर झपाट्याने घसरतो. त्याला समुद्राकडून मिळणारे बाष्प आणि ऊर्जा एकाएकी बंद झाल्यामुळे त्याचे टप्प्याटप्प्याने (१२ ते २४ तासांत) डिप्रेशन आणि मग सर्वसाधारण कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होते. त्यासोबत वाऱ्यांचा जोर आणि पावसाचे प्रमाणही कमी होते. 

आधुनिक तंत्रज्ञान आणि चक्रीवादळाचा अंदाज    
'पायलीन चक्रीवादळ १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान ओडीशातील गोपालपूरजवळ जमिनीवर प्रवेश करेल.' भारतीय हवामानशास्त्र विभागाने तीन -चार दिवस आधीच वर्तवलेल्या या अंदाजामुळे आंध्रप्रदेश आणि ओडीशातील किनारपट्टीच्या भागातून नागरिकांचे तत्काळ स्थलांतर करण्यास आणि प्रतिबंधक उपाय योजण्यास प्रशासनाला वेळ मिळाला. देशभरातून संबंधित विभागांच्या सर्व यंत्रणा आपत्कालीन स्थितीशी मुकाबला करण्यासाठी त्या त्या भागांत रवाना झाल्या. आज हे घडू शकले याला कारण भारताकडे असणारे कृत्रिम उपग्रह, डॉप्लर रडार, वेदर स्टेशन यांचे जाळे आणि शास्त्रज्ञांनी त्या निरीक्षणांच्या आधारावर विकसित केलेली अंदाज वर्तवणारी मॉडेल. या मॉडेलच्या आधारे चक्रीवादळाच्या स्वरुपात होणारे बदल, त्याचा समुद्रावरील बदलत जाणारा मार्ग आणि जमिनीवर प्रवेश करताच त्यात होऊ शकणारे बदल आधीच अचूक वर्तवण्यात आले. यांमुळे या आधीच्या महाचक्रीवादळांच्या तुलनेत यंदा नुकसान कमी करणे भारताला शक्य होणार आहे.
-------------------------------------------------------------

मान्सूनचा कृपावर्षाव

गावाबाहेर माळरानांवर पडलेल्या चारा छावण्या, भर उन्हात चारा आणि पाण्यासाठी तासंतास रांगेत थांबलेले शेतकरी आणि शाळा सोडून चारा छावण्यांवरच मुक्काम ठोकलेल्या माणदेशी मुलांना पाहून गेल्या वर्षीच्या दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष अनुभवता येत होती. २०१२ च्या जून ते सप्टेंबर दरम्यान न बरसलेल्या मान्सूनचे परिणाम त्यानंतर नऊ महिन्यांनी यंदाच्या मान्सूनच्या आगमनापूर्वी चरणसीमेवर पोचले होते. चारा छावण्यांवर शेतकऱ्यांच्या मुलाखती घेताना त्यांच्या डोळ्यातील अश्रु आणि शब्दांमधून व्यक्त होणारी हतबलता आणि नैराश्य हेही मान्सूनचे थेट परिणाम म्हणावे लागतील. राज्यात इतरत्रही काही वेगळी परिस्थिती नव्हती. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला होता. खरीप तर हाती लागले नव्हतेच, पाणीसाठे नसल्याने रब्बीही झाले नव्हते. पिण्याच्या पाण्यासाठी आठवड्यातून एकदा येणाऱ्या टैन्करवर उडणारी झुंबड आणि मिळेल तितक्या चाऱ्यावर जनावरांना किमान जगवण्याची धडपड हे चित्र सार्वत्रिक झालेले. शहरांमध्येही पाणीकपात आणि रस्त्यारस्त्यावर दिसणारे टैन्कर गेल्या वर्षी रुसलेल्या मान्सूनची कथा सांगत होते. 

मात्र, यंदाचा जून जसा उजाडला तसे हे चित्र एकाएकी पालटू लागले. तळाला गेलेले पाणीसाठे पुन्हा भरू लागले. दोन वर्षांनी पेरण्या उत्तम झाल्या. चाऱ्याची चिंता मिटली. टैन्करची संख्या कमी कमी होत गेली. महिन्याभरातच राज्यातील बहुतेक सर्व जलाशय भरभरून वाहू लागले. गेल्या वर्षी दुष्काळ दाखवलेल्या मान्सूनने यंदा आपली कृपादृष्टी दाखवत राज्यावर सरासरीपेक्षा जास्त वर्षाव केला. मान्सूनमध्ये चढ-उतार येत असले तरी, अंतिमतः तो संतुलन राखत असतो याचा प्रत्यय यंदाच्या मान्सूनने पुन्हा दिला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) नोंदींनुसार एक जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूनचा हंगाम मानला जातो. या हंगामासाठी आयएमडीने मान्सूनच्या दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. यंदा या हंगामात देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पर्जन्यमानाच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांतील हा सर्वोत्तम मान्सून मानला जात आहे.

यंदाच्या मान्सूनची वैशिष्ट्ये  
एक जून रोजी केरळात दाखल झालेला मान्सून हा आगमनाच्या वेळीच 'निराळा' असल्याचे तज्ञांच्या लक्षात आले. सर्वसाधारण कालावधीच्या एक महिना आधीच केवळ १६ दिवसांत संपूर्ण भारत व्यापून आपण यंदा 'सुपरफास्ट' खेळी करणार असल्याचे 'ओपनिंग'लाच दाखवून दिले. त्यानंतरही सलग १६ आठवडे त्याने आपला 'रेन रेट' सरासरीच्यावर ठेवून ऐतिहासिक कामगिरी बजावली. एखादा 'व्हाईट वॉश' मिळाल्यावर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या संघाने पुढच्या सामन्यात धावांचा वर्षाव करून नवा उच्चांक नोंदवण्यासारखीच ही स्थिती म्हणावी लागेल. गेल्या वर्षी देशभरात हंगामात सरासरीपेक्षा ७ टक्के कमी पाऊस झाला होता. देशाच्या ३६ हवामानशास्त्रीय विभागांपैकी १३ विभागांमध्ये दुष्काळी स्थिती होती. २२ विभागांमध्ये पावसाने जेमतेम सरासरी गाठली होती. तर, फक्त एका विभागात पाऊस सरासरीपेक्षा जास्त नोंदला गेला होता. यंदा मात्र हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. यंदा देशभरात दीर्घकालीन सरासरीपेक्षा ६ टक्के पाऊस जास्त झाला असून, ३६ पैकी ६ विभागांमध्ये तो सरासरीपेक्षा खाली आहे (ज्यांपैकी ३ विभाग हे ईशान्येकडील आहेत जिथे पावसाचे प्रमाण प्रचंड असते) म्हणजे बिहार, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या तीनच विभागांत दुष्काळी स्थिती आहे. आणि अद्याप मान्सून परतलेला नाही त्यामुळे ही परिस्थितीही काही प्रमाणात बदलू शकते. यंदा १४ विभागांत पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे (गेल्या वर्षी फक्त एका), तर १६ विभागांत त्याने सरासरी गाठलेली आहे. सलग दोन वर्षांत दोन भिन्न प्रकारचे मान्सून देशाने अनुभवले. 
राज्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. गेल्या वर्षी कोकण विभागात हंगामात सरासरीपेक्षा तीन टक्के कमी, मध्य महाराष्ट्रात २५ टक्के कमी, मराठवाड्यात ३३ टक्के कमी तर विदर्भात सरासरीपेक्षा ८ टक्के पाऊस जास्त झाला होता. यंदा कोकणात हंगामातील सरासरीपेक्षा २० टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात २१ टक्के जास्त, मराठवाड्यात ९ टक्के जास्त, तर विदर्भात तब्बल ४३ टक्के जास्त पाऊस झाला आहे. २०१२ च्या दुष्काळी स्थितीतून राज्याला पूर्णपणे बाहेर काढण्याचे काम यंदाच्या मान्सूनने केले असल्याचे किमान आकडेवारीवरून तरी दिसून येत आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. एल. एस. राठोड यांच्या म्हणण्यानुसार, 'मान्सूनचे वेळेत झालेले आगमन, आगमनापासून शेवटपर्यंत पावसामध्ये राहिलेले सातत्य, 'ड्राय स्पेल'चे कमी प्रमाण आणि त्यांचा कमी कालावधी ही यंदाच्या मान्सूनची वैशिष्ट्ये म्हणता येतील. देशाच्या बहुतेक भागांत आता पाण्याचे दुर्भिक्ष्य संपलेले असून, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे खरीपाप्रमाणेच रब्बीचेही बम्पर पिक यंदा अपेक्षित आहे. सर्व जलाशय भरलेले असल्यामुळे पिण्यासाठी, उद्योगांसाठीही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.'
मात्र, यंदा पावसाने काही ठिकाणी कहरही केला. उत्तराखंडमधील दुर्घटनेसाठीही यंदाचा मान्सून ओळखला जाईल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि नुकत्याच गुजरातमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. काही राज्यांमध्ये जास्त पावसामुळेही पिकांचे मोठे नुकसान झाले (महाराष्ट्रात विदर्भात). मात्र, गेल्या वर्षीच्या दुष्काळी स्थितीकडे पाहता यंदाचा मान्सून कृपावर्षाव करणाराच ठरला असे म्हणता येईल. 

हवामानशास्त्रीय स्थिती 
गेल्या वर्षी जूनमध्ये प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या 'एल निनो' स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहांमध्ये अडथळा निर्माण होऊन बंगालच्या उपसागरातील आणि हिंदी महासागरावरील बाष्प पूर्वेकडे खेचले गेले होते. परिणामी देशभरात जून कोरडा गेला. त्यामुळे निर्माण झालेली स्थिती सबंध हंगामात पूर्ववत होऊ शकली नाही. परिणामी देशातील १३ विभागांना (महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा) दुष्काळाला सामोरे जावे लागले. यंदा मात्र सबंध हंगामात एल निनो स्थितीचा अभाव असल्यामुळे मान्सूनचे वारे विनाअडथळा प्रवाहीत राहिले. त्याचप्रमाणे हंगामाच्या सुरुवातीपासूनच अखेरपर्यंत बंगालच्या उपसागरात नियमितपणे कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्याने पावसात सातत्य राहिले. आंध्र प्रदेश आणि ओडिशादरम्यान मध्य- वायव्य बंगालच्या उपसागरात बहुतेक कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन ती विदर्भावरून मध्य प्रदेश आणि नंतर गुजरात, राजस्थानकडे सरकल्यामुळे महाराष्ट्राला या स्थितीचा मोठा फायदा झाला (या ठिकाणी मान्सून काळात वातावरणाच्या वरच्या थरातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली). दुसरीकडे अरबी समुद्रात मान्सून काळात पश्चिम किनारपट्टीला समांतर असणारा कमी दाबाचा पट्टा (ऑफ शोअर ट्रफ) सलग अडीच महिने सक्रिय राहिल्याने त्याचाही फायदा चांगल्या पावसाच्या रूपाने गुजरातपासून केरळ किनारपट्टीला झाला. 

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

सरस्वती नदी आजही आहे!

मान्सून डायरी
सरस्वती एक काल्पनिक नदी होती असा इंग्रजांचा समज होता. त्यामुळे तिचा, तिच्या उपनद्यांचा  हंगामी नाला म्हणून उल्लेख करण्यात आला. पण या परिसरातल्या  उत्खननाच्या जागा बघितल्यावर सरस्वती नदी एक मिथक होती असं कोणीही म्हणू शकणार नाही.
'प्रोजेक्ट मेघदूत'चा गट गेले काही दिवस सरस्वती नदीच्या उगमाच्या आणि उगमाबरोबरच तिच्याकडे असलेल्या अनेक गुपितांचा शोध घेत सरस्वतीच्या खोऱ्यात प्रवास करत होता. आदिबद्री, कुरु क्षेत्र आणि नंतर पिओहा या मार्गानंतर 'प्रोजेक्ट मेघदूत'चा प्रवास पुढे सुरू झाला. या पुढच्या मार्गावर त्यांनी काही पुरातत्त्व स्थळांना (archaeological sites) भेटी दिल्या.
सरस्वती नदीच्या खोऱ्यामधल्या काही पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या काही स्थळांना भेटी दिल्या. सरस्वती नदी ही एखादी नदी नव्हती. सरस्वतीला एकूण सात छोटय़ामोठय़ा नद्या जोडल्या गेल्या होत्या. ही सर्व पुरातत्त्वीय स्थळे या सात नद्यांच्या क्षेत्रात सापडतात. या सात नद्यांची मिळून सरस्वती ही माता आहे असा त्यांचाऋग्वेदात उल्लेखही आहे. या सात नद्यांचा महाभारतातही उल्लेख सापडतो. त्यातल्या काही प्रमुख उपनद्यांची नावं गंभीरा, दृषद्वती आणि आज जी नदी अस्तित्वात आहे ती म्हणजे घग्गर अशा तीन महत्त्वाच्या उपनद्या आहेत. 
घग्गर
सरस्वतीच्या उपनद्यांपैकी घग्गर, पावसाळ्याचे काही महिनेच का होईना पण आजही अस्तित्वात आहे. घग्गरचं पात्र आजही मोठं आहे. पावसाळ्यात ही नदी बऱ्यापैकी नियमित वाहात असते. सरस्वतीच्या मार्गातूनही या नदीला काही ओढे-नाले मिळतात आणि ती पुढे पाकिस्तानच्या दिशेने वाहायला लागते. ती पाकिस्तानात पोचते तेव्हा तिला हाकारा म्हणतात. भारतामध्ये ती राजस्थानमधला अनुपगढ ओलांडून सरस्वती नदीचं प्राचीन पात्र ओलांडून ती प्रवास करते. ती जेव्हा कच्छच्या रणाच्या जवळून वाहते तेव्हा तिला नारा अशा नावानं ओळखलं जातं. तिथे सरस्वती नदीचा त्रिभुजप्रदेश तयार झालेला आहे. तो त्रिभुजप्रदेश म्हणजे आजचं कच्छचं रण. या सगळ्या वाटेची सुरुवात 'प्रोजेक्ट मेघदूत'च्या गटाने कुरु क्षेत्रापासून केली.
इतिहासाला आव्हान देणारी राखीगढी
राखीगढी हे हरियाणा राज्यातल्या हिसार जिल्ह्य़ामधील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. हे दृषद्वती आणि सरस्वती या नद्यांच्या संगमाजवळ असलेलं स्थळ आहे. इथे सात टेकाड आहेत. तिथे आपल्याला पुरातनकालीन संस्कृतीचे अवशेष सापडतात. इथे 'प्रोजेक्ट मेघदूत'च्या गटाला एखादी पुरातत्त्वीय जागा कशी शोधायची याचीही माहिती झाली असं ते सांगतात.
एखादे पुरातत्त्वीय स्थळ कसे शोधायचे?
एखादे टेकाड असते. अगदी लहान. म्हणजे आपण साधारण १००-१५० पावलांमध्ये ती चढून जाऊ शकू असे. त्या टेकडीला अगदी बारीक अशा मातीच्या भांडय़ांचं कवच आलेलं असतं. म्हणजे आपली नेहमीची टेकडी आपल्याला ज्या रंगाची दिसते तिथेच एक कोलाज केल्यासारखे मातीच्या भांडय़ांचे तुकडे दिसू शकतात. काहीवेळा त्यात मातीच्या भांडय़ांचा वरचा भाग असतो, काही चित्रकला केलेले तुकडे असतात, बांगडय़ा असतात. त्याचबरोबर लहान मुलांच्या खेळण्यांचे अवशेषही आपल्याला दिसून येतात. हे दिसलं की या टेकाडाच्या पोटात काही लपलेलं असू शकतं.
'प्रोजेक्ट मेघदूत'च्या गटाने जेव्हा या स्थळाला भेट दिली तेव्हा हे स्थळ त्यावर संशोधन करून तो भाग पुन्हा बुजवून टाकण्यात आला होता. इथे १३-१४ वर्षांपूर्वी उत्खनन करून झालेलं होतं. यां उत्खननामध्ये शास्त्रज्ञांना एक संपूर्ण शहर दिसून आलं होतं. या स्थळावर खोल्या आहेत, शौचालये आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी अतिशय प्रगत व्यवस्था आहेत. त्याचबरोबर इथे लोकांना बसायची जागा आणि एक मोठे व्यासपीठही आहे. याचबरोबर इथे बळी द्यायची व्यवस्थाही केलेली दिसते. या सर्व रचनांचे अनेक अर्थ शास्त्रज्ञ वेगवेगळ्या पद्धतीने लावूशकतात. राखीगढीमध्ये त्यांना यज्ञ करण्याची सोयही आढळली. खरंतर आज जे प्रागैतिहासिक गोष्टींचं ज्ञान आपल्याला आहे, त्याप्रमाणे इथे या सगळ्या गोष्टी सापडायला नकोत. पण जर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सापडत असतील तर त्यामुळे हा सर्व इतिहास बदलण्याची शक्यता आहे. २००३ नंतर इथलं उत्खनन थांबलं. त्यानंतर गेली अनेक र्वष यावर काही नवीन ज्ञान उपलब्ध झालं नाही. पण आता परत या ठिकाणी उत्खनन करण्याची परवानगी पुण्यातल्या डेक्कन कॉलेजचे सह-संचालक वसंत शिंदे यांना मिळाली आहे. या वर्षीपासून या स्थळावर त्याचं संशोधन सुरू होईल. 
ही राखीगढी ३०० हेक्टरमध्ये पसरली आहे. ही जागा मोहंजोदडोपेक्षाही मोठी आहे. एवढंच नव्हे तर अनेक शास्त्रज्ञांच्या मते ही जागा सिंधू संस्कृतीपेक्षाही प्राचीन असणार आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्यांनुसार इथे मिळालेले अवशेष हडप्पा किंवा मोहंजोदडोवर मिळालेल्या अवशेषांपेक्षा प्राचीन आहेत. या सर्व कारणांमुळे राखीगढी ही जागा अतिशय महत्त्वाची ठरते.
राखीगढीमध्ये 'प्रोजेक्ट मेघदूत'ला वजीरसिंग नावाचे गृहस्थ भेटले. ते सुरुवातीपासूनच राखीगढीमध्ये राहायला आहेत. त्यांनी अनेक र्वष या पुरातत्त्वीय स्थळाचा अभ्यास केला आहे आणि अनेक र्वष ते इथल्या घटनांवर लक्ष ठेवून असतात. हे काम करता करता त्यांनी इथल्या स्थळांवर मिळालेल्या अनेक वस्तूंचा संग्रह केला आहे. त्या संग्रहात अनेक मडकी, धातूची अवजारं, मातीपासून, शंखापासून आणि खडय़ांपासून बनवलेले दागिने, लहान मुलांची खेळणीही आहेत. या खेळण्यांमध्ये असणारा मातीचा खुळखुळा अजूनही वाजतो. या खेळण्यांमध्ये अनेक प्राण्यांच्या प्रतिकृतीही आहेत. यामध्ये बैल आणि कुत्रा हे आहेत. इथल्या काही खेळण्यांना चाकाची व्यवस्था केली आहे. याचबरोबर त्यात अत्तराची किंवा काजळाची कुपीही पाहायला मिळते. या सगळ्या वस्तूंचं एक छोटं संग्रहालय करून त्यांनी त्यांच्या घरात ठेवलं आहे. आज राखीगढीमध्ये जरी उत्खनन सुरू नसलं तरी त्यांच्या घरातला हा खजिना बघितल्यावर इथे काय काय सापडू शकेल हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तिथे मिळालेल्या माहितीनुसार ही जागा हडप्पाकालीन आहे. इ.स.पूर्व ३५०० ते ४००० वर्षे जुनी ही जागा आहे. हा काळ हडप्पापेक्षा थोडा आधीचाच आहे. खरंतर अशी उत्खननाची जागा जपली गेली पाहिजे, पण आज 'प्रोजेक्ट मेघदूत'ने पाहिलेली जागा आणि तशा अनेक जागा यांची व्यवस्थित निगा राखली गेलेली दिसत नाही. राखीगढीवर आज फक्त काही गोवऱ्या थापल्या गेल्या आहेत. तिथे गेल्यावर हे इतकं महत्त्वाचं क्षेत्र आहे हे आपल्याला पटकन लक्षातही येणार नाही अशी अवस्था इथली आहे. त्याच्या सभोवताली कुठलंच पक्कं कंपाऊंड नाही. पणआर्किऑलॉजीकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाने लावलेली कोणतीही पाटी किंवा त्यांच्या अस्तित्वाची कोणतीही खूण आपल्याला दिसत नाही. हे जवळजवळ सगळ्याच पुरातत्त्वीय क्षेत्रांचं चित्र आहे!
आजच्या राखीगढीमध्ये फिरताना जुन्या शहराच्या काही भिंती अजूनही दिसतात. गावाच्या काही बोळातून फिरताना मध्येच एक मातीची भिंत दिसते, हे वजीरसिंग 'प्रोजेक्ट मेघदूत'च्या गटाला दाखवत होते. आज हे गाव या प्राचीन शहराच्या ठिकाणी उभं आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला आजच्या बांधकामाबरोबरच त्या ५ ते ६ हजार वर्षांपूर्वी केलेल्या बांधकामाचे नमुनेही बघायला मिळतात. खूप भारावून टाकणारं हे चित्र असतं.
अग्रोहा
वजीरसिंग यांनी सांगितल्यानुसार 'प्रोजेक्ट मेघदूत'ने त्यांच्या पुढच्या सफरीच्या वाटेवर असणारं अग्रोहा हे ठिकाण गाठलं. अग्रोहाला पोहोचेपर्यंत सूर्य मावळलेला होता. तिथे पोचताच एक फलक लावलेला होता 'प्राचीन स्थळ' म्हणून. तिथे गेल्या गेल्याच विटांचा एक मोठा थर दिसत होता. त्याबरोबरच बऱ्याचशा तुटक्या मडक्यांचे अवशेषही दिसत होते. आत्तापर्यंत बरेच लहान तुकडे दिसत होते, पण तुकडे त्यापेक्षा बरेच मोठे होते. सूर्य मावळलेला होता आणि फोटो काढण्यासाठी कॅमेरामधली बॅटरीही संपत आली होती. तसेच पुढे गेल्यावर एक मोठ्ठी तटबंदीसारखं ठिकाण दिसत होतं. ते ठिकाण कदाचित तेव्हाच्या शासकाचा राजवाडा असू शकेल. खाली एक पाटी होती, त्या पाटीनुसार 'अग्रोहा' हे ठिकाण फिरोजशहा तुघलकच्या शासनकाळापर्यंत वाणिज्य आणि राजकीय घडामोडींचं एक प्रमुख ठिकाण होतं. कारण हे ठिकाण प्राचीन वाणिज्य मार्ग तक्षशीला ते मथुरा यावर होतं. काहींच्या म्हणण्यानुसार हे प्राचीन शहर महाराजा अग्रसेनने वसवलं होतं. याचा उल्लेख पाणिनीने लिहिलेल्या अष्टाध्यायीमध्ये झालेला आहे. पुरातात्त्विक उत्खननातून हे स्पष्ट होतं की, इ.स.पूर्व चौथ्या-तिसऱ्यापासून ते तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंत इथे वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाफ झाला आहे. शक, कुशाण काळापासून ते गुप्त साम्राज्यापर्यंतच्या अनेक प्रकारच्या वस्तू इथे सापडतात. इथल्या काही पत्र्याच्या मुद्रांवर ब्राह्मी लिपीमधून काही लिखाणकाम केल्याचं आढळून आलं आहे.
इथे जी रचना पाहायला मिळाली ती बरोबर नालंदासारखी दिसणारी होती. म्हणजे इथे काही ना काही कॉन्फरन्सेस चालत असणार अशी ही रचना होती. त्याचबरोबर भरपूर शौचालये एकानंतर एक अशी लागून होती. त्याचबरोबर हॉस्टेल्ससारख्या अनेक खोल्या तिथे होत्या. तिथे एक मोठं व्यासपीठही होतं. म्हणजे इथे काही ना काही प्रकारचं विद्यादान होत असावं अशी ती वास्तुरचना होती. कदाचित सरस्वती नदीच्या पात्रामधील आधीच्या प्रगत संस्कृतींमुळे या पुढच्या राजवटींनी ही जागा बांधली असावी.
फतेहगडच्या वाटेवर- बनावली
या नंतरचा प्रवास हा प्रत्यक्ष सरस्वतीच्या खोऱ्यातला असणार होता. राखीगढीनंतर 'प्रोजेक्ट मेघदूत'चा प्रवास फतेहगडच्या वाटेवर सुरू झाला. या भागातील बरेचसे लोक हे फाळणीच्या दरम्यान पाकिस्तानातून येऊन इथे स्थायिक झालेले मुसलमान होते. तरीही या भागामध्ये मुसलमान शैलीच्या रचना अतिशय कमी आहेत. मुस्लीम नावं खूप कमी आहे. तसेच, जशी दग्र्यात बांग ऐकू येते तशी बांगही या भागात ऐकू येत नाही. 
या भागात फिरण्यासाठी मदत म्हणून सरस्वती नदीवर काम करणाऱ्या दर्शनलाल जैन यांनी त्या भागाची माहिती असलेली एक व्यक्ती या गटाबरोबर इकडचा भाग दाखवण्यासाठी पाठवली होती. दर्शनलाल जैन हे सरस्वती शोध प्रतिष्ठानतर्फे सरस्वती नदी पुनर्प्रवाहित करण्यासाठी या भागात काम करत असतात. त्यांनी या गटाला दोन ठिकाणांची नावं सांगितली. त्यातल्या एकाच नाव बानवली. या ठिकाणहून वेगवेगळ्या काळांची माहिती आपल्याला मिळू शकते. एक म्हणजे पूर्व हडप्पा, उत्तर हडप्पा. तेव्हाच्या विशेषत: नियोजनबद्ध गृहरचना, पक्क्या विटांनी बनवलेली घरे इत्यादी बघायला मिळतात. त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या धातूच्या वस्तू, मौल्यवान दगड हेही मिळतं. इथे एक सुंदर विहीरही दिसली. ही विहीर साधारणत: पाच हजार वर्षांपूर्वींची असेल आणि याच्याच काही अंतरावर सरस्वती वाहात होती. ही विहीर एका घराच्या खोलीमधली होती. अशा अनेक विहिरी लोकांनी आपापल्या घरांमध्ये बांधल्या असणार. या ज्या विहिरी होत्या त्या काळात इथे मान्सून कमी झालेला होता, पण शेजारीच सरस्वती नदी वाहात असल्यामुळे भूगर्भातील पाणी हे लोक वापरत असावेत. 
कुणाल गावामध्ये सरस्वतीचा पुरावा!
बानवलीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हा गट कुणाल या गावी पोचला. कुणाल हे राजा अशोकाच्या मुलाचं नाव. त्याच्या नावांनी ही जागा नंतर प्रसिद्ध झाली असं म्हणतात. इथे पोचेपर्यंत क्षितिजापर्यंत प्रचंड शेती दिसत होती. प्रचंड भात शेती. हे दृश्य खरंतर वरून पाऊस पडत असताना दिसलं तर ते योग्य वाटतं, पण आकाश बघितलं तर निळशार आकाश. आणि खाली विरुद्ध चित्र जमिनीवर- पाण्याने भरलेली शेती आणि भात. आणि ही सर्व शेती ही जमिनीच्या पाण्यावर सुरू होती. तिथे या गटाला तेजेंदर सिंग नावाचा शेतकरी भेटला. तिथे गेल्या गेल्या यांनी सरस्वती नदीविषयी सांगायला सुरु वात केली. ''ये वो जगा है जहांसे सरस्वती बहती थी!'' त्यांनी पुढे जाऊन मेघदूताच्या गटाला एक मार्ग दाखवला, जिथून सरस्वती वाहात होती.साधारण फाळणीपर्यंत इथून ती वाहात होती असं त्याचे आजोबा त्याला सांगायचे अशी त्याची आठवण होती. पण आता हे सगळं लोकांनी बुजवून टाकलं असंही तो सांगत होता. 

कधी कधी जेव्हा पाऊस चांगला होतो तेव्हा इथून पाणी वाहायला लागतं असंही सांगत होता. एक नैसर्गिक वाहणारा, काही ठरावीकऋतूंमध्ये सुरू असणारा हा नदीचा प्रवाह अडवला गेला होता. नुसता अडवला नाही तर त्या प्रवाहाची वाट बुजवण्यात आली होती. वाट बुजवून त्यावर वस्तुत: सहा महिने जेव्हा त्या प्रवाहात पाणी नसेल तेव्हा शेती करायची सोडून लोकं बाराही महिने त्या बुजवलेल्या नदीच्या पात्रात आपली शेती करत होते. तिथले काही लोकं तर त्या प्रवाहाला सरस्वती म्हणत होते. पण त्या सरस्वतीचं महत्त्व त्यांना माहीत नव्हतं. माहीत असतं तर हा प्रवाह बुजवला गेला नसता कदाचित.
फाळणी, स्पर्धा आणि सरस्वती
तेजेंदर सिंग आणि त्यांचे आजोबा इथे फाळणीनंतर राहायला आलेले होते. त्यामुळे त्यांना फाळणीच्या आधीच्या सरस्वती नदीची स्थिती माहीत नाही. या गावांमध्ये राहणारी सर्वच लोकं फाळणीनंतर इथे वसलेली. ते वसले कारण इथे शेती चांगली होत होती. तेव्हा भारत सरकारपुढे या सर्व जनतेला पोसायचं कसं, असा प्रश्न होता. त्या वेळी त्यांना तिथली त्यांच्या कुटुंबाच्या प्रमाणात जमीन कसायला देऊ केली. जमीन यांच्या ताब्यात दिली, पण ती जमीन त्यांच्या नावावर नव्हती. पण या जमिनीवरून तुम्हाला कोणी काढणार नाही अशी ग्वाहीही भारत सरकारने तेव्हा त्यांना दिली होती. हे करताना सरस्वती नदीच्या बाबतीत एक मोठी चूक घडली. लोकांनी ही नदी पाहिली होती, तिच्या कमरेएवढय़ा पाण्यामधून ते ६०च्या दशकापर्यंत गेलेलेही होते. पण त्या वेळेच्या सरकारी दस्तावेजांमध्ये कुठेही 'सरस्वती नदी' असा उल्लेख नव्हता.
इथे वसलेल्या लोकांना भारत सरकारने सरस्वती नदीच्या पात्रातल्याही काही जमिनी देऊ केल्या होत्या, पण त्यांना केवळ सहा महिने त्यावर शेती करायची असं बंधन होतं. कारण बाकीचे सहा महिने इथले नाले त्या प्रवाहामधून वाहणार होते. नाले असंच तेव्हा म्हटलं गेलं होतं, कारण उल्लेखांमध्ये सरस्वती असं नावच नव्हतं. सुरुवातीला लोकांनी हा करार पाळला, पण त्यानंतर जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापायी हे ओढे, हे प्राचीन प्रवाह लोकांनी बुजवायला सुरू केले. आज बाराही महिने लोकं या प्रवाहांमध्ये शेती करतात.
'प्रोजेक्ट मेघदूत'ने पंजाब रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्या वेळेला नक्की काय घडलं हे शोधून काढायला सुरुवात केली. तेव्हा असं लक्षात आलं की, त्या वेळेला दिल्या गेलेल्या जमिनीमध्ये ६ लाख ११ हजार एकर जमीन ही हंगामी नद्यांच्या आणि नाल्यांच्या काठाची होती. आज या भागात कोणतेही हंगामी प्रवाह वाहताना दिसत नाहीत. बहुतेक ठिकाणी या हंगामी नाल्यांचे मूळ प्रवाह बुजवण्यात आलेले आहेत. हे सर्व प्रवाह पूर्वी सरस्वती नदीला मिळत होते. आता हे प्रवाहच बुजवले गेल्यामुळे सरस्वती नदीत पाणी येणार कुठून?
सरस्वती एक काल्पनिक नदी होती असा इंग्रजांचा समज होता. त्यामुळे सरस्वती नदीचा किंवा तिच्या उपनद्यांचा ठिकठिकाणी हंगामी नाला म्हणून उल्लेख करण्यात आला होता. तेव्हाचे सर्व दस्तावेज ब्रिटिश सरकारकडून भारत सरकारकडे चालत आलेले आणि त्यात कोणताही बदल केला गेला नव्हता. त्यामुळे स्वतंत्र भारतामध्येही सरकारने हे नाले समजून सरस्वती नदीच्या पात्रात शेती करायला परवानगी दिली. फाळणीच्या आधी मात्र ही नदी मॉन्सूनच्या काळात विनाअडथळा वाहात होती. तेजेंदर सिंगसारखे या कुणाल गावातले शेतकरी त्यांच्या सरस्वती नदीच्या आठवणी आजही सांगतात.
कुणालचं दुर्लक्षित क्षेत्र
'प्रोजेक्ट मेघदूत'चा गट कुणालच्या उत्खनन केलेल्या ठिकाणी पोचला. ही जागा दुर्लक्षाची परिसीमा आहे! इथे कोणाचंच लक्ष नाही. पुण्यात बसून या ठिकाणाचं वर्णन ऐकताना एक वेगळं दृश्य आपल्यासमोर दिसत असतं. आपण एका अतिशय प्रगत आणि जगातल्या काही सर्वात जुन्या संस्कृतीचा अभ्यास करायला चाललो आहोत अशी समजूत असते. कदाचित याचा पूर्ण अभ्यास झाला तर सिंधू संस्कृतीचं मूळ घेऊन आलेल्या आपल्या संस्कृतीचा इतिहास कदाचित बदलला जाऊ शकतो. पण त्या ठिकाणी गेल्यावर चित्र अगदीच वेगळं असतं. इतक्या मुलभूत संशोधनाच्या विषयावर इतकं गंभीर दुर्लक्ष का, असा प्रश्न पडतो.
इथे आत शिरताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. रखवालदारासाठी एक खोली तयार करून ठेवलेली, पण रखवालदार गायब. बाहेर कम्पाऊंड. त्याच्या तारा तुटलेल्या. लोकं रीतसर उत्खनन केलेल्या क्षेत्रांमधून माती काढून नेतात. आतमधले अवशेष तसेच एक्स्पोज्ड पडून असतात. तिथे बऱ्याच गोष्टी दिसत होत्या- मोठय़ा थाळ्या, रांजण असं बरंच काही होतं. हे अवशेष पाच हजार वर्षांहून जास्त जुने आहेत. इथे एक प्राचीन संस्कृती अस्तित्वात होती. जवळून सरस्वती नदी वाहाते आहे, त्या सरस्वती नदीच्या खोऱ्यात वसलेल्या एका प्राचीन शहराच्या ठिकाणी राहात आहोत या प्रकारची कोणतीही जाणीव हे ठिकाण बघताना झाली नाही. तशी जाणीव व्हावी अशी कोणतीही रचना तिथे अस्तित्वात नव्हती. या सर्व क्षेत्रात मिळालेल्या अवशेषांवरून या जागेची परंपरा मोहंजोदडो-हडप्पापेक्षाही मागे जाते.
हे सर्व बघून 'प्रोजेक्ट मेघदूत'चा गट दुसऱ्या दिवशी कालीबंगला पोचला. इथेही राखीगढीसारखेच काही अवशेष बघायला मिळतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जागा सरस्वतीच्या अगदी काठावर वसलेली आहे. या सगळ्या उत्खननाच्या जागा बघितल्यावर सरस्वती नदी हे एक मिथ्य होती असं कोणीही म्हणू शकणार नाही. या सर्व मार्गावर लोकांना १२००पेक्षा अधिक उत्खनन क्षेत्रे सापडली आहेत आणि ही सर्व सरस्वती किंवा तिच्या उपनद्यांच्या काठावर वसलेली आहेत. यांचा काळ चार हजार ते पाच हजार वर्षांपूर्वीच्या आणि हा असा काळ होता जेव्हा या भागातला मान्सून हा चांगला होता. नंतर मान्सून कमी झाला, नदीची पात्रं कोरडी पडली आणि आज ही सगळी प्राचीन संस्कृती जमिनीखाली दडली गेली आहे

सरस्वती नदीच्या शोधात...

मान्सून डायरी (९ ऑगस्ट २०१३- लोकप्रभा) 
'प्रोजेक्ट मेघदूत'च्या तिसऱ्या टप्प्याचा प्रवास मान्सूनबरोबर सुरू आहे. या वेळी सरस्वती नदीच्या टापूमध्ये फिरून सगळ्या मध्य भारतातल्या पावसाचा, त्यातून विकसित झालेल्या संस्कृतीचा, त्यातून निर्माण झालेल्या वैविध्याचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.
या वर्षी जून महिन्यापासून या 'प्रोजेक्ट मेघदूत'च्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या तिसऱ्या टप्प्यातला पहिला भाग अगुम्बे ते म्हसवड असा होता. अगुम्बे हा कर्नाटक राज्यामधला प्रदेश. पश्चिम घाटातला सर्वात अधिक पाऊस इथे पडतो. तिकडून महाराष्ट्रातला दुष्काळी भाग म्हणजे माण तालुका असा पहिल्या टप्प्यातला प्रवास या गटाने पूर्ण केला. यामध्ये घाट, कोकण आणि काही दुष्काळी प्रदेशांतला मान्सून या गटाने अनुभवला होता. या पहिल्या भागामध्ये पंधरा जण सहभागी झाले होते. या पंधराजणांमध्ये काही पीएच.डी. करणारे होते, ते अगदी अकरावी-बारावीमधले विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते.
गेल्याच आठवडय़ात या गटातल्या मयूरेश प्रभुणे आणि मंदार मोरवणे यांनी तिसऱ्या टप्प्यातल्या दुसऱ्या भागाची सुरुवात केली. हा प्रवास पुण्यापासून परत पुण्याला येईपर्यंत असा पाच हजार किलोमीटरचा असणार आहे. मार्ग साधारणत: पुण्याहून दिल्ली- हरियाणा- आदिबद्री- तेथून उलटा प्रवास पश्चिमेकडे आहे. हा प्रवास कुरुक्षेत्रवरून राचीगढी जे प्राचीन संस्कृतींचे अवशेष असलेले मोहंजोदडोपेक्षाही पुरातन आणि अजून उत्खनन न झालेले ठिकाण असा आहे. त्यानंतर शिरसाह हे ठिकाण जिथे सरस्वतीच्या सात उपनद्या एकत्र येतात ते ठिकाण, या ठिकाणाचा उल्लेख महाभारतामध्येही सापडतो. त्यानंतर राजस्थानमधले कालीबंग नावाचे ठिकाण. त्यानंतर मग जैसलमेरला जिथे अत्यंत कमी पावसाचे प्रमाण असते तिथे ते येणार आहेत. मग दक्षिणेला येऊन गुजरातमधल्या धोलविराज, मग कच्छच्या भागात ते येणार आहेत. तिथून नारायण सरोवर. इथे येईपर्यंत या गटाने सरस्वती नदीचा संपूर्ण मार्ग पाहिला असेल आणि त्यामुळेच पुरातन काळात मान्सून कसा होता हेही समजायला मदत होईल अशी या गटाची अपेक्षा आहे.
प्रोजेक्ट मेघदूत.. आत्तापर्यंत
तीन वेगवेगळ्या पद्धतींनी तीन वेगळ्या भागांमध्ये मान्सूनच्या प्रवासाचा वेध घेत प्रोजेक्ट मेघदूताचा प्रवास सुरू आहे. या तिन्ही वर्षांमधल्या प्रवासाचा रस्ता वेगळा, अभ्यासाचं स्वरूप वेगळं, उद्देश वेगळा. मात्र, या तीनही वर्षांमधल्या प्रवासामागचं सूत्र एकच. भारतातल्या मान्सूनचा शोध. या शोधामध्ये केवळ याचा हवामानशास्त्रीय दृष्टिकोन बघितला गेला नव्हता. तो या सगळ्या अभ्यासाचा उद्देशही नाही. या अभ्यासामधून 'प्रोजेक्ट मेघदूत' गटाला भारत समजून घ्यायचा होता, भारतातल्या विविध परंपरा, संस्कृती, माणसं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रथा.. आणि या सगळ्याला जोडणारा एक समान धागा- तो धागा म्हणजे मान्सून.
या संपूर्ण भारताला जोडणाऱ्या धाग्याचा अभ्यास करताना तो एकूण पाच टप्प्यांत करायचा असे नियोजन केले होते. हे नियोजन पाच वर्षांचे होते. या नियोजनानुसारच आजपर्यंत 'प्रोजेक्ट मेघदूत' गटाने आपला प्रत्येक वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. 'प्रोजेक्ट मेघदूत'च्या पहिल्या वर्षी हा प्रवास पश्चिम घाटापासून केला. हा पहिल्या वर्षांचा प्रवास २०११ सालच्या जूनच्या पहिल्या आठवडय़ामध्ये केला गेला होता. पहिल्या वर्षीची थीम होती विविधता. मान्सूनची विविध रूपं पाहण्याच्या उद्देशाने या प्रवासाचे नियोजन केले गेले होते. मान्सून जेव्हा पश्चिम घाटात पोहोचतो तेव्हा आपल्याला बरीच विविधता पाहायला मिळते. विविधता फक्त पावसाची किंवा निसर्गाची नाही पण माणसांमध्येही आपल्याला विविधता बघायला मिळते. त्यामुळे पहिल्या वर्षी या टीमला ही विविधता आणि या विविधतेमुळे होणारे परिणाम, हेदेखील पाहायला मिळाले. म्हणजे अगदी काही बदलत्या व्यावसायिक गरजांमुळे बेरोजगार झालेले मच्छीमार दिसले आणि त्याचबरोबर पावसाळ्याच्या या चार महिन्यांत नवीन तंत्रज्ञान वापरून, मग ते पर्यावरणाला कितीही घातक का असेना, तर ते तंत्रज्ञान वापरून कोटय़धीश झालेले मच्छीमारही बघायला मिळाले. पहिल्या वर्षीचा अनुभव गाठीशी बांधून 'प्रोजेक्ट मेघदूत' गट काही नव्या अभ्यासकांबरोबर दुसऱ्या वर्षीच्या मान्सूनचा वेध घ्यायला सज्ज झाला होता.
हा संपूर्ण भाग पश्चिम भारताचा म्हणजे गुजरात, हरियाणा, राजस्थान. या भागांतल्या सर्व पुरातत्त्व अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी स्थळे आहेत. ही सर्व स्थळे हडप्पा-मोहंजोदडो या काळाची आहेत. ही अशी स्थळे आहेत की ज्यांचा कालावधी पाच हजार वर्षांपूर्वीचा होतो. म्हणजे साधारण ख्रिस्तपूर्व तीन ते साडेतीन हजार वष्रे! ही संस्कृती त्या काळाची सर्वात प्रगत अशी संस्कृती होती. आजची परिस्थिती पाहिली तर आज या सर्व भागांत खूप कमी पाऊस पडतो. पंजाब, हरियाणा या राज्यांतही आपण पाहिले तर तिथे पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. या राज्यांना पाणी मिळते ते हिमालयातल्या नद्यांमुळे, तिथला बर्फ वितळून मिळणारे पाणी आहे. म्हणूनच, या हिमालयातल्या नद्यांमुळेच हा प्रदेश शेती क्षेत्रामध्ये विकास करू शकला आहे.  हा पाऊस, जसे जसे आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जायला लागू तसा तसा आपल्याला तो कमीच होताना दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे या भागात समुद्रापासूनच अंतर कमी कमी होत जाणारे आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला मान्सूनचे वारे पोहोचायला इथे वेळ लागतो आणि ते पोहोचले तरी त्यांची तीव्रता, म्हणजेच त्यांच्यामधल्या बाष्पाचे प्रमाण फारच कमी झालेले असते. काही वेळा या भागाला पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळेही मिळतो. मयूरेशने सांगितल्याप्रमाणे या दोन्ही वाऱ्याचे जर एकत्रित प्रमाण काढले तरी या पश्चिम भारतातल्या पावसाचे प्रमाण हे अतिशय कमीच दिसते. 

प्राचीन संस्कृती आणि पाऊस
या अतिशय कमी प्रमाणातल्या पावसाचे आणि या प्रगत प्राचीन संस्कृतींचे नाते कसे बनले? कारण आपण पहिल्याप्रमाणे ज्या भागांमध्ये भरपूर पाऊस, सुपीक जमीन, तिथेच प्राचीन संस्कृती उदयाला आल्या, वाढल्या आणि प्रगत झाल्या. मग, या कमी पावसाच्या प्रदेशात या प्रगत संस्कृती कशा निपजल्या? हे भाग सुपीक झाले ते कशाने? हिमालयांमधल्या नद्यांमुळे? पण, भूगोल पहिला तर या नद्या जशा जशा पश्चिमेला खाली येतात तशा तशा त्या पाकिस्तानच्या दिशेने जायला लागतात आणि नंतर समुद्राला मिळतात, मग पश्चिमेकडचा खालचा भाग कोरडाच राहतो. मग या भागामध्ये या वेगवेगळी संस्कृती कशी विकसित झाली? अशाच प्रश्नांचा शोध घेताना 'प्रोजेक्ट मेघदूत' गटाला काही शोधनिबंध वाचायला मिळाले. या शोधनिबंधांमधून त्यांच्या लक्षात असे आले की, या भागामधून साधारणत: ख्रिस्तपूर्व २५०० ते १९०० या कालखंडात पाऊस आणखी पूर्वेकडे वळला. म्हणजेच पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकायला लागले. त्यामुळे पश्चिमेकडे जो चांगला पाऊस सुरू होता तो हळूहळू कमी होत गेला. हा जो काहीशे वर्षांचा कालखंड आहे या कालखंडामध्ये या सर्व प्रदेशांतल्या नद्या कोरडय़ा पडत गेल्या आणि त्यामुळेच आजूबाजूला वसलेली मानव-वस्तीही पूर्वेकडे वळायला लागली. त्यामुळे या भागांत विकसित झालेली संस्कृती हळूहळू लोप पावायला लागली. 

सरस्वती नदीचा शोध
या नद्यांचा अभ्यास केला, त्यांचा भूगोल पाहिला तर आपल्याला असे लक्षात येईल की, या सर्व नद्या सरस्वती नदीशी जोडल्या गेल्या आहेत. मग या गटाने हा सरस्वतीच्या मार्गाचा अभ्यास केला. त्या अभ्यासामधून असे लक्षात आले की, हा सरस्वती नदीचा मार्ग शिवालिक पर्वतरांगांपासून सुरू होतो. तिथून तो हरियाणा, पंजाब, राजस्थान असे करत करत त्याला दोन शाखा फुटतात. एक शाखा कच्छच्या मार्गाने अरबी समुद्रात जाते. या मार्गाची दुसरी शाखा पाकिस्तानच्या माग्रे जाते. ती शाखा परत कच्छमध्ये येऊन परत अरबी समुद्राला मिळते. सरस्वती नदीचा हा जो मार्ग आहे, साधारण याच मार्गावरून 'प्रोजेक्ट मेघदूता'च्या गटाला यावर्षी फिरायचे होते. म्हणूनच या वर्षी या गटाने या पुढच्या मार्गाची थीम 'सरस्वती नदीचा शोध' अशीच ठेवली. टीम याच सरस्वतीच्या मार्गावरून मान्सूनचा पाठलाग करणार होती.
मागच्या वर्षी या गटाने जेव्हा मान्सूनचा पाठलाग मध्य भारतातून केला तेव्हा त्यांना मान्सूनचे आताच्या संस्कृतीवर होणारे परिणाम अनुभवायला मिळाले. तर या वर्षी ही टीम प्रमुख दोन गोष्टी पाहायला उत्सुक होती. एक तर, सरस्वती नदीचा शोध घेताना त्या सर्व पुरातनकालीन स्थळांवर ते जाणार होते. ते फिरताना त्या काळाची संस्कृती आणि त्याच्यामध्ये त्या वेळेच्या चांगल्या पावसाबद्दलच्या काही खुणा त्यांना तपासता येणार होत्या. त्याचबरोबर, आज या क्षेत्रात कमी पाऊस असल्यामुळे आज तिथले लोक कसे निभावत आहेत हे त्यांना पाहायला मिळणार होते. त्यामध्ये त्यांची शेती, पशुपालन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि इतर जलव्यवस्थापन पाहणे असा त्यांचा उद्देश होता. 

पावसापासून सुरू होणारे कालमापन
या वेळेला मागच्या वर्षी ज्या भागात थांबता आले नाही तिथे थांबून काही लोकांशी बातचीत या गटाने केली. यामध्ये भिल्ल आणि भिलाला या जमातीची लोक होती. यांच्याकडून काही महत्त्वाच्या गोष्टी कळल्या. त्या म्हणजे या लोकांकडे पावसाचे निरीक्षण करण्यासाठी काही पद्धती आहेत, पण दुर्दैवाने त्यांच्या तरुण पिढीला याबद्दलची काहीही माहिती नाही. त्यानंतर हा गट राजस्थानमध्ये गेला असताना त्यांना तिकडचा एक भिल्ल जमातीतला इसम भेटला. त्यांनी त्याला महिने विचारले असता तर तो आषाढ, श्रावण, भाद्रपद अशी नावे सांगायला लागला. वर्ष सुरू कधी होते असे विचारले तरी आषाढ.. श्रावण.. भाद्रपद! तर कारण असे होते की, आज ते लोक इंग्रजी कालमापन वापरत असले तरी त्यांचे कालमापन हे पावसापासून सुरू होते. म्हणजे पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा त्यांचा नवा महिना सुरू होतो. अश्विनपर्यंत त्यांचा पावसाचा महिना असतो. त्यांच्यामधल्याच दुसऱ्याला पाऊस कधी पडेल असे विचारले तर त्याचे उत्तर फारच वेगळे होते. त्याचे म्हणणे होती की माणसाचा जसा गर्भ नऊ महिन्यांचा असतो, तसाच तो पावसाचा असतो. मग तो कसा मोजायचा? तर आषाढपासून मागे नऊ मोजत जायचे. अशा प्रकारे त्यांना बरोब्बर तीन महिने हे पावसाळ्याचे मिळतात.
मान्सून आणि मेघदूत
प्रोजेक्ट मेघदूतचे दुसरे वर्षे सुरू झाले २०१२च्या जून महिन्यामध्ये. या वर्षी मध्य भारतातून मान्सूनचा पाठलाग करायचा असे नियोजन होते. या वर्षी फक्त मध्य प्रदेश हे राज्य घेतले होते. म्हणजे महाराष्ट्रातल्या विदर्भापासून ते बुंदेलखंडपर्यंत असा प्रवास योजला होता. मध्य भारतामध्ये मुख्यत: दोन भागांमधले नर्ऋत्य मोसमी वारे एकत्र येतात. साधारण मध्य प्रदेशाच्या मध्यात, अरबी समुद्राकडून येणारे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे एकत्र येतात. त्यामुळे या भागामध्ये पाऊस नेमका कोणत्या वाऱ्यांमुळे आहे ते कळत नसतं. हा सगळा प्रदेश ऐतिहासिकदृष्टय़ाही खूप महत्त्वाचा मानला जातो. इथे काही प्राचीन राजवटी होऊन गेल्या म्हणून आणि शेतीच्या दृष्टीनेही या भागाचे महत्त्व फार आहे. या भागातही आपल्याला बरीच भौगोलिक विविधता पाहायला मिळते. टेकडय़ांबरोबरच इथे बरीचशी सपाट जमीनही पाहायला मिळते. भौगोलिक विविधतेबरोबरच किंवा म्हणूनच इथे खाद्यपदार्थामध्येही बरीच विविधता पाहायला मिळाली. या सगळ्याच गोष्टींमध्ये पाऊस नेमका कसा काम करतो हे या गटाला पाहायचं होतं. याला धरूनच अजून एक धागा या गटाने पकडला होता आणि तो म्हणजे जगप्रसिद्ध अशा 'मेघदूत' या काव्याचा. या काव्यामध्ये उल्लेख केलेल्या मार्गावरून जायचं आणि त्या काव्यामागचा अर्थ ओळखायचा असेही काम या गटाने करायचे ठरवले होते. कालिदासाने लिहिलेल्या या मेघदूत काव्यातल्या ढगाचा प्रवास महाराष्ट्रामधल्या रामटेकपासून सुरू होऊन तो कुरुक्षेत्रापर्यंत जाऊन संपतो. हा सर्व भाग हा मध्य भारतामध्ये येतो. म्हणूनही या मार्गाचा अभ्यास करायचा असे ठरवले होते. या दुसऱ्या टप्प्यात मेघदूताचा मार्ग बघता बघता हाच मान्सूनचा मार्ग आहे हे या गटाच्या लक्षात आले. दुसऱ्या टप्प्यातल्या अभ्यासामध्ये मान्सूनचा आणि मेघदूत या काव्याचा संबंध लावणे आणि त्यानुसार आत्ताच्या परिस्थितीचे विश्लेषण करणे हे खूपच मूलभूत काम 'प्रोजेक्ट मेघदूत' गटाने केले.
रेवाडी समाज
राजस्थानमधल्या चित्तोडगढ जिल्ह्य़ातला हा रेवाडी समाज महाराष्ट्र किंवा कर्नाटकमधल्या धनगराशी मिळताजुळता आहे. ते पावसाळ्याचे चार महिने आपल्या गावी परत येतात आणि बाकीचे महिने आपल्या जनावरांना घेऊन बाहेर असतात. राजस्थानमधून ते नर्मदेच्या खोऱ्यामध्ये येतात. तिथे पावसाची चिन्हे दिसली की परत आपल्या गावी परत जातात. ज्यांच्याकडे जमीन आहे ते शेती करतात. महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचाही असाच काहीसा प्रवास असतो. म्हणजेच, जे जनावरांवर अवलंबून असतात किंवा शेतीवर अवलंबून असतात, त्यांचा प्रवास हा या पावसालाच धरून आखलेला असतो. या एका उदाहरणामधून आपल्याला देशभरातला मान्सूनच्या काळातला स्थलांतराचा एक मुद्दा ठळकपणे दिसून येतो.
मिराशी आणि नाथजोगी समाज
पाऊस बघता बघता अनेक वेळा काही विलक्षण माणसे भेटतात. त्यातलाच हा मिराशी समाज आणि नाथजोगी समाज. यांची खासियत अशी की हे लोक नमाजपण पढतात आणि त्याचबरोबर पूजाअर्चाही करतात. या समाजाने धर्मातर करून इस्लाम धर्म स्वीकारलेला. ते ढोलकी बनवायचे आणि व्यापारी लोकांच्या नोंदी ठेवायचे काम करायचे. आता ढोलकीही गेली आणि नोंदी ठेवायच्या वेगळ्या पद्धती विकसित झाल्या. त्यांचे परंपरागत व्यवसाय गेले आणि त्यामुळे आता ते रस्त्याची कामे करत आहेत.
तसेच नाथजोगी हे परंपरागत पीठ दळून देणारे. पण इलेक्ट्रॉनिक पीठ गिरण्या आल्यावर त्यांचा व्यवसाय एकाएकी बंद झाला. आता हे लोक मशीनला ग्रीस लावून देणे अशा व्यवसायात आले आहेत. हे दोन्हीही समाज एका छोटय़ाशा जमिनीच्या तुकडय़ावर पालं करून राहात होते. त्याच्यापकी कोणाच्याही स्वत:च्या जमिनी नव्हत्या. गिरणी आल्यावर त्यांचा व्यवसाय बंद झाला. दुसरा कोणताच उद्योग करायचे त्यांच्याकडे कौशल्य नाही. त्याचबरोबर त्यांच्याकडे स्वत:ची जमीन नाही! करणार काय? शिक्षण अत्यंत कमी. आपण आपल्या राहणीमानात काही बदल करतो तेव्हा एखाद्या समूहाचा व्यवसायच बंद पाडत असतो. पण असे बदल करताना आपल्याला हे लक्षात येत नाही. या आणि अशा गोष्टींचा या मान्सूनच्या अनुषंगाने समाजशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास व्हायला हवा आहे, असे 'प्रोजेक्ट मेघदूत'ला वाटते.
भारतात अनेक ठिकाणी या कामाच्या निमित्ताने िहडताना काही गोष्टी स्पष्टपणे लक्षात आल्या असे मयूरेश म्हणतो. त्याच्या मते भारतातल्या कुठल्याही व्यवस्था बघा, त्यांचा एकटा विचार करताच येणार नाही. व्यवस्था असो, जमाती असोत, त्यांच्या परंपरा असोत, त्यांचे व्यवसाय असो हे सगळं एका मोठय़ा जाळ्याचा भाग आहे. प्रत्येक धाग्याच्या अस्तित्वाला काही कारण आहे, प्रत्येक धागा दुसऱ्या धाग्याशी जोडला गेला आहे. तो सुटा नाही. प्रत्येकाला एक इतिहास आहे, परंपरा आहे. हेच चित्र भारतात कुठेही जा, आपल्याला दिसून येते. प्रत्येक माणूस, त्याची एक गोष्ट आणि ती गोष्ट त्याच्यासारख्याच अनेक माणसांच्या गोष्टीशी कुठेतरी जोडली गेलेली!
अशाच अनेक गोष्टी ऐकण्यासाठी कुरुक्षेत्रापासून पुढे 'प्रोजेक्ट मेघदूत' प्रवास आता सुरू झाला आहे

प्रतीक्षा पावसाच्या ज्ञानकोशाची! (लोकप्रभाच्या पावसाळा विशेषांकात (ऑगस्ट २०१३) प्रसिद्ध झालेली मुलाखत)


शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या देशात पाऊस हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याला केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा सगळ्याच पातळ्यांवर महत्त्वाचं स्थान आहे. अशा या पावसाचा देशभर फिरून सर्व अंगांनी अभ्यास करायचा असं ठरवून तरुणांचा एक गट 'प्रोजेक्ट मेघदूत' नावाचा एक प्रकल्प हातात घेऊन बाहेर पडला. गेली तीन वर्षे त्यांनी पावसाच्या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन पाऊस समजून घेतला. अर्थात आपल्या देशाची एकूण व्याप्ती पाहता त्यांचा हा पावसाचा अभ्यास एवढय़ात संपलेला नाही. पण गेल्या तीन वर्षांच्या भटकंतीत त्यांच्या शिदोरीत बरंच काही साठलं आहे. समाजाकडे बघण्याची एक नवी दृष्टीच त्यांना मिळाली आहे. 
'प्रोजेक्ट मेघदूत'च्या या सगळ्या प्रक्रियेबद्दल या प्रकल्पाचा प्रमुख मयूरेश प्रभुणे याच्याशी बातचीत-


 तुझी आणि पावसाची ही मैत्री कधीपासूनची?
अगदी लहानपणीपासून. कोणत्याही मैत्रीमध्ये असतात तसे या मैत्रीमध्येही बरेच चढ-उतार आहेत. नंतर थोडं मोठं झाल्यावर पावसात भटकंती करायला सुरु वात झाली होती. कधी मित्रांबरोबर, तर कधी एकटाच. त्यामुळे लहानपणीचा पाऊस आठवतो तो असा. त्यानंतर शाळा संपवून कॉलेजमध्ये गेल्यावर खगोलशास्त्राचं वेड लागलं होतं. 'खगोल विश्व' नावाची संस्था आम्ही चिंचवडला सुरू केली होती. त्याच्या माध्यमातून आम्ही खगोलशास्त्राचा अभ्यास करायचो. खगोलशास्त्र शिकताना हे पावसाळ्याचे चार महिने असे असतात की जेव्हा आकाश निरीक्षण करायला आकाश मोकळं मिळणं मुश्कील होऊन जातं, तेव्हा पहिल्यांदा पावसाबद्दल, या मान्सूनच्या चार महिन्यांचा विचार सुरू झाला. मग जून ते सप्टेंबर करायचं काय म्हणून आम्ही काही इनडोअर कार्यक्रम करायचो. या 'खगोल विश्व'मुळे तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे पावसाबद्दलचा, पाऊस एन्जॉय करणं सोडून विचार सुरू झाला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीचा शास्त्रोक्त पद्धतीने विचार करायची सवय लागली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असाच विचार करणारा, माझ्याच वयाचा एक मस्त गटही मिळाला. आताच्या 'प्रोजेक्ट मेघदूत'ची मुळंही या 'खगोल विश्व'सारख्या उपक्रमांमधून झाली असं म्हणायला हरकत नाही. 

 तू तेव्हा पत्रकार म्हणूनही काम करत होतास ना?
हो, म्हणजे पदवीचं शिक्षण संपल्यावर. मी विज्ञान पत्रकारिता करत होतो, आणि अजूनही करतो. २००७ च्या सुरुवातीला मी हवामानही कव्हर करू लागलो. मी माझ्या कामाच्या निमित्ताने पुण्यातल्या बऱ्याच विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांशी संबंधित होतो. २००७ मध्ये यात पुणे वेधशाळेचीही (आय.एम.डी.) भर पडली.


 म्हणजे पत्रकारितेतून तू मॉन्सूनकडे अधिक लक्षपूर्वकपणे बघायला लागलास?
हो, अनेक वेळा बातम्या देताना अनेक विषय कानावर पडायचे. २००७ सालच्या एप्रिलमध्ये जेव्हा वेधशाळेने आपला मॉन्सूनचा अंदाज नोंदवला तेव्हा त्यात त्यांनी सहा  वेगवेगळ्या मुद्दय़ांच्या आधारे तो अंदाज वर्तवला होता. त्यातून १६ वेगवेगळ्या मुद्दय़ांवर आधारलेलं नारळीकरांचं मॉडेल माहीत होतं. त्या ज्ञानात भर पडली. मग कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर नेमकं काय होतं. ऑफशोर ट्रफ आहे, सायक्लोन्स आहेत, अशा काय काय संकल्पना त्या वेळेस त्या कळत गेल्या. त्या बातम्या आम्ही त्यातल्या त्यात सोप्या मराठीत देण्याचा प्रयत्न करायचो. नंतर मॉन्सून झाल्यावर अंदाज किती बरोबर आला, किती चुकला, त्याची कारणं काय, अशा बातम्याही आम्ही करत होतो. म्हणून हे पहिलं वर्ष मॉन्सूनबद्दल वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्यात निघून गेलं. तेव्हाच आय.आय.टी.एम.  (Indian Institute of Tropical Meteorology) मधल्या काही हवामान शास्त्रज्ञांशी ओळख झाली. त्यांच्याकडूनही बरंच काही शिकायला मिळालं. त्यानंतर २००८ मध्ये मग या सगळ्या संकल्पना सर्वसामान्यांना कळतील अशा भाषेत मांडायला सुरुवात केली. तेव्हा मेधा खोले या पुणे ऑब्जर्वेटरीच्या संचालकपदी होत्या. त्यांनी एक एक गोष्ट समजून सांगायला सुरुवात केली. त्यांनी मला समजावताना काही नकाशे मागवले. त्यात मॉन्सून तयार कसा होतो, हाय प्रेशर, लो प्रेशर, मॉन्सून पुढे पुढे कसा सरकतो, अशी सगळी सविस्तर माहिती दिली. ही माहिती मी माझ्या बातम्यांमधून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तर करत होतोच, पण त्याचबरोबर माझ्या 'खगोल विश्व'च्या सहकाऱ्यांसमोर मी ही माहिती वेळोवेळी मांडत होतो. त्याचबरोबरच मॉन्सून म्हणजे पाऊस ही आपली समजूत चुकीची कशी आहे, हेही आम्ही मांडत होतो.

 मग तुला हे सगळं प्रत्यक्ष जाऊन बघावं असं कसं वाटलं?
मी हवामानाच्या बातम्या देत होतो, पण ऑफशोअर ट्रफ आहे, लो प्रेशर एरिया आहे, पण वातावरणात नक्की काय घडतं हे समजून घेण्याची इच्छा होती. महत्त्वाचं म्हणजे, या वातावरणातल्या बदलांमुळे जर कोकणासारख्या भागांत पूर येत असेल तर याचे वातावरणावर आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष मानवी आयुष्यात काय परिणाम होतात हे बघणं अत्यावश्यक आहे, असं जाणवू लागलं.


 खरंय, पाऊस म्हणजे फक्त वातावरणातला बदल नाहीये.
होय, पाऊस म्हणजे फक्त इतका मिलिमीटर, तेव्हाच प्रेशर काय, वाऱ्याचा जोर काय, फार फार तर नद्यांना पूर आले आहेत आणि पुढच्या दोन दिवसांचा पावसाचा अंदाज. बातम्या करताना पाऊस यापलीकडे जात नव्हता. पुढे-मागे ज्या घटना घडलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे तिथले स्थानिक लोक त्या घटनेकडे काय म्हणून पाहत आहेत हे समजून घेणं आणि त्याची नोंद होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे मनामध्ये होतंच, पण हे माझ्या पत्रकारितेत यावं असंही वाटायला लागलं. यामध्ये पूर नेमका निर्माण कसा होतो, तेव्हा पावसाबरोबर आणखी कोणती लक्षणं दिसत असतात, तेव्हा माणसं काय, कशी वागतात, प्राणी-पक्ष्यांचं काय असे प्रश्न पडायला लागले. पूर ओसरल्यावर तिथे जाणं वेगळं, मग लोकांच्या काही स्टोरीज करता येतात; पण ते घडायच्या आधी आपण तिथे गेलो तर आपल्याला ती घटना संपूर्णपणे अनुभवता येईल, ते सगळं चक्र समजेल. मग अशा घटनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरची उत्तरं आपल्याला आधीच शोधता येतील असं वाटायला लागले. पावसाला फक्त पाऊस म्हणून न बघता एक घटना म्हणून बघणं आणि त्याचा अभ्यास करणं हे मला महत्त्वाचं वाटायला लागलं.


 आपल्याकडच्या पावसाचा असा अभ्यास यापूर्वी कधी झालाय?
अगदी अशा प्रकारचा नाही, पण काही प्रमाणात झाला आहे. मी माझी ही कल्पना माझ्या ऑफिसमध्ये सांगायला सुरुवात केली होती, तेव्हा काही लोकांनी अलेक्झांडर फ्रेटरच्या पुस्तकाची आठवण करून दिली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव ऐकून होतो, पण ते अजून वाचलं नव्हतं. मग त्यांचं 'चेसिंग द मॉन्सून' नावाचं पुस्तक मागवलं आणि एका रात्रीत वाचून काढलं. फ्रेटर हे एक ब्रिटिश पर्यटक आणि लेखक, त्यांनी भारतात मॉन्सूनच्या काळात फिरून पाऊस आणि त्यानिमिताने त्यांना दिसणाऱ्या दृश्यांची टिपणे काढली होती. १९८७ मध्ये फ्रेटर यांनी मॉन्सूनच्या आधीपासूनच भारतात तळ ठोकला होता. तेव्हा उत्तर-मध्य भारतात कडक उन्हाळ्यामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती त्यांनी अनुभवली होती. त्यानंतर मॉन्सूनच्या दक्षिण भारतातल्या आगमनापासून त्याचा उत्तरेकडे पाठलाग केला. या प्रवासामध्ये त्यांनी विविध लोकांशी बोलून, पावसाचा लोकांवर कसा परिणाम होतो याचं उत्तम वर्णन त्यांच्या पुस्तकात केलं आहे. 
माझ्याही मनात असंच काहीसं होतं. पाऊस असताना प्रत्यक्ष बाहेर पडून फिरावं आणि प्रत्यक्ष पाऊस अनुभवावा, पण हे करणं लगेच जमलं नाही. मग २०१० मध्ये पहिल्यांदा आमच्या 'खगोल विश्व'च्या कॅम्पसमध्ये मॉन्सून हा विषय अभ्यासायला सुरुवात केली. मुलांना घेऊन सिंहगडावर गेलो. तिथे पहिले मॉन्सूनचे वारे कसे येतात हे पाहिलं, पण तेव्हा हे नक्की ठरवलं होतं, की पुढच्या वर्षी आपण मॉन्सूनचा चक्क पाठलाग करायचा.
यापूर्वी मॉन्सूनचा आमच्या डोक्यात होता तसा व्यापक स्वरूपात अभ्यास झालेला आमच्या तरी वाचनात आला नव्हता. आम्ही खूप शोधनिबंध मिळवले. त्यात काम केलेलं असतं, पण हे सगळे अभ्यास खूप तुकडय़ातुकडय़ांमध्ये असतात. म्हणजे मॉन्सून होऊन गेल्यावर त्याचा अन्नधान्यावर कसा परिणाम होतो, याचा गेल्या तीन वर्षांचा आढावा असतो. दुष्काळ किंवा पुरामुळे किती नुकसान झालं याची आकडेवारी असते. पण मॉन्सूनची ही एकत्रित प्रक्रिया आहे, असा कोणी त्याचा अभ्यास केलेला आमच्या तरी वाचनात आला नव्हता.


 मॉन्सूनचा असा पाठलाग करायची तयारी कशी केली?
याआधी आमची निरीक्षणं सुरूच होती. ती निरीक्षणं खगोलशास्त्रीय होती. मग आम्ही आणखी खोलात या सगळ्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आम्ही म्हणजे मी आणि माझ्या 'खगोल विश्व'च्या आणि काही इतर मित्रांनी. तेव्हाच मी मॉन्सूनबद्दल, त्याचा पाठलाग का करावासा वाटतो आहे याबद्दल ब्लॉगही लिहायला सुरुवात केली होती. २०११ मध्ये मी तेव्हा रु टीन पत्रकारिता सोडली होती. विज्ञानप्रसार करण्यासाठी स्वत:चं मासिक सुरू केलं होतं. त्यामुळे आता माझा वेळ माझ्या हातात होता. मला कुठून सुट्टी काढायला लागणार नव्हती. म्हणून आणखी वेळ मी माझ्या स्वत:च्या अभ्यासाला देऊ शकत होतो. हा सगळा अभ्यास करताना मी माझी ही कल्पना माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मांडली. 


 काय होती तुझी ही पाठलागाची कल्पना?
मला केरळपासून ते महाराष्ट्रापर्यंत मॉन्सूनबरोबर फिरायचं होतं. मॉन्सून येतो म्हणजे नेमकं काय होतं, ही घटना समजून घ्यायची होती. एक उन्हाळ्यातला असा दिवस असतो की, उन्हाळा त्याच्या चरणसीमेवर असतो आणि त्या दिवशी एकाएकी चित्र पालटू लागतं. या बदलाची सीमा काय आहे, ते आम्हाला समजून घ्यायचं होतं. यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं, त्यामुळे आमच्याकडे तसे काही ठोकताळे नव्हते, की आम्ही काय केलं म्हणजे बरोबर किंवा काय चूक! आत्तापर्यंत पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास होतच होता, पण आमचा केवळ तसा अभ्यास असणार नसून त्या आकडेवारीचा परिणाम प्रत्यक्ष बघणं असा होता, कारण त्याचे परिणाम कसे आहेत ते समजून घेतलं तर तो कसा आहे, हे आपल्याला कळू शकतं. एखाद्या वर्षीचा मॉन्सून चांगला असणं किंवा नसणं म्हणजे काय? उदाहरणार्थ गेल्या वर्षीचा महाराष्ट्रातला मॉन्सून चांगला नव्हता, कारण पावसावर अवलंबून असलेल्या शेतीचं नुकसान झालं होतं, लोकांचे व्यवसाय बुडाले होते. लोक आपलं गाव सोडून स्थलांतर करत होते. म्हणून, वाईट मॉन्सून म्हणजे शेतकऱ्यांना किती भरपाई दिली याची आकडेवारी नसून त्याचा लोकांवर काय परिणाम झाला आहे; मुलांवर, त्यांच्या शिक्षणावर काय परिणाम झाला आहे हे समजून घेणं म्हणजे मॉन्सून समजून घेणं. आम्हाला असाच अख्ख्या भारताचा मॉन्सून समजून घ्यायचा होता. याचं एक शास्त्रीय चित्र समजून घ्यायचं होतं आणि ते लोकांसमोर मांडायचं होतं. 


 मान्सूनच्या पाठलागाचं तुझं हे तिसरं वर्ष आहे, तर हे कार्यक्रम तुम्ही कशाच्या आधारे ठरवत होतात?
सुदैवाने अशी एक गोष्ट घडत होती की, प्रत्येक वर्षी एक काही तरी संदर्भ मिळत होता. जसं पहिल्या वर्षीचा आमचा धागा होता तो म्हणजे अलेक्झांडर फ्रेटरचं 'चेसिंग द मॉन्सून' हे पुस्तक. त्यांनी केरळमध्ये बराच काळ घालवला होता. ते मुंबईमध्ये आले होते. त्यांनी मॉन्सूनपूर्व परिस्थतीही अनुभवली होती. काहीशी तशीच परिस्थिती आम्ही अनुभवत होतो. त्या वेळेस फ्रेटरमुळे एक दिशा निश्चित मिळाली. त्यांना जसंच्या तसं फॉलो आम्ही केलं नाही. त्यांच्या फक्त ह्य़ूमन स्टोरीज होत्या. आमच्या फिरण्याला, निरीक्षणांना शास्त्रीय आधारही आम्ही देत होतो. त्यानंतर आम्हाला 'मेघदूत' हे कालिदासाचं काव्य एक आधार म्हणून होतं आणि या तिसऱ्या वर्षी आम्ही पश्चिमोत्तर भारतात पावसाचा अभ्यास करत आहोत. यामध्ये आम्ही सरस्वती नदीचा अभ्यास करतो आहोत. त्याचबरोबर या नदीच्या प्रवाहादरम्यान येणाऱ्या काही पुरातन संस्कृतींचा, त्यांचा आणि पावसाच्या संबंधाचा अभ्यास आम्ही करतो आहोत.


 पहिल्या वर्षी म्हणजे २०११ मध्ये तुमचा प्रवास कसा झाला?
पहिल्या वर्षीच्या मॉन्सूनचा आम्ही केरळमधून मागोवा घ्यायचं ठरवलं होतं. पहिल्यांदा हवामानाचे अंदाज आले होते, त्यामुळे साधारण कधी मॉन्सून दाखल होईल अशी पुसट कल्पना होती. केरळमध्ये मॉन्सूनचं आगमन होताना आम्ही तिथे असणार होतो. जिथे पहिले वारे येतील तिथे आम्ही असणार होतो आणि ते वारे जसे जसे पुढे सरकत जातील, तो लो प्रेशरचा बेल्ट जसा पुढे सरकत जाईल त्याला धरून उत्तरेकडे पावसाचं प्रमाण वाढत वाढत जाईल. त्या वाढत्या प्रमाणाबरोबरच त्याला फॉलो करून आम्ही वर येऊ आणि त्या क्षणाला होणारे जे बदल आहेत, निसर्गातले आणि समाजातले, ते बदल टिपणं असा आमचा कार्यक्रम होता. हे बदल टिपले, खरं तर हे बदल खूपच पटकन होणारे आहेत; पण हे बदल टिपून आम्हाला मॉन्सून अधिक चांगला समजून घेता येणार होता, कारण एकदा स्थिरस्थावर झालेला मॉन्सून आपल्याला समाजातले फार बदल दाखवत नाही, पण या पहिल्या क्षणाचे जे बदल आहेत ते शास्त्रीयदृष्टय़ा महत्त्वाचे ठरतील. आम्हाला या पहिल्या प्रवासात या प्रदेशाची जैवविविधता समजून घ्यायची होती. त्याचबरोबर वेधशाळेकडून आम्ही एक छोटी ऑबझव्‍‌र्हेटरीही बरोबर घेतली होती. त्यामध्ये आम्हाला हवामानाची निरीक्षणं घ्यायची होती आणि त्याचबरोबर समाजाच्या कोणत्या घटकावर पावसाचा कसा परिणाम होतो ते आम्हाला पाहायचं होतं.


 या प्रवासात तुम्ही काय काय केलं?
पहिल्या वर्षी आम्ही सात जण या प्रवासाला निघालो होतो. त्यात आम्ही हवामानाचा अभ्यास करणारच होतो. प्रत्येक ठिकाणाची हवामानशास्त्रीय निरीक्षणे आम्ही घेत होतो. त्याचबरोबर या सगळ्या प्रदेशाचा भौगोलिक अभ्यास आम्ही करत होतो. आपण अनेक वेळा म्हणतो की झाडं भरपूर असल्यावर पाऊस पडतो, पण ते तसं नसतं. पाऊस आहे म्हणून झाडंही चांगली असतात. याचबरोबर आम्ही या सगळ्या प्रदेशाच्या जैवविविधतेचाही अभ्यास करणार होतो. यामधून आम्हाला फक्त या सगळ्या प्रदेशाची माहिती होणार नव्हती. तर, पाऊस येण्याआधी इथल्या वनस्पतीवर त्याची काय लक्षणे दिसायला लागतात, कोणते कीटक दिसतात, याचा अंदाजही आम्ही बांधत होतो. यामध्ये प्राणी-पक्ष्यांच्या हालचालींमधले बदल असतील, पालवी असेल. तर ते आधी होणारे बदल आणि मग पहिला पाऊस पडल्यावर होणारे बदल आम्हाला अनुभवायचे होते. म्हणजे अगदी आपण बेडकांचं उदाहरण घेऊ, कुठे असतात हे वर्षभर, कुठून येतात हे एकदम पाऊस सुरू होण्याआधी? कसं कळतं त्यांना? हे सगळं अभ्यासायचं होतं. अजून एक महत्त्वाचा भाग होता ते समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी जाऊन बोलण्याचा. त्यांचे अनुभव ऐकण्याचा, नोंदवून घेण्याचा. हेच सर्व आम्ही तीनही वर्षे करत आलो आहोत.
पावसाचा अभ्यास करताना आम्ही वेगवेगळ्या सामाजिक स्तरांमधल्या लोकांशी बोलत होतो. त्यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली ती म्हणजे, आर्थिकदृष्टय़ा सर्वात दुर्बल जो घटक आहे, त्यावर पावसाचा थेट परिणाम अधिक होत असतो. कारण तो थेट त्या पावसावर अवलंबून असतो. आर्थिकदृष्टय़ा सबल गट, त्याचा व्यवसाय पाण्यावर किंवा पावसावर किंवा कोणत्याच प्रकारे निसर्गावर अवलंबून नसतो. त्याच्याकडे पाणी साठवायचे विविध पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे लहरी पावसामुळे आर्थिक घडी बिघडते ती समाजाच्या सर्वात दुर्बल घटकाची.


 तुमच्या प्रकल्पाला 'मेघदूत' हे नाव कसं सुचलं?
आम्ही आमच्या प्रवासाला 'चेसिंग द मॉन्सून' असं जरी म्हणत असलो तरी 'मेघदूत' या शब्दाला एक वेगळा अर्थ होता. कालिदासाचं जे काव्य आहे त्यामध्ये कल्पना अशी आहे की तो ढग एका यक्षाचा निरोप घेऊन त्याच्या प्रेयसीकडे चालला आहे. तो जाताना एका ठराविक मार्गाला धरून प्रवास करतो आहे. तो मार्ग मॉन्सूनशी मिळताजुळता आहे असं काही लोकांनी सांगितलं होतं. आम्ही आमच्या दुसऱ्या वर्षीच्या प्रवासात ते तपासणार होतो. आम्ही आमचा प्रवास एक दूत म्हणूनच फिरणार होतो. काही माहिती एकत्रित करून आणि मग ती कायमस्वरूपी सगळ्यांसाठी जतन करून ठेवणं हे आमचं काम होतं त्यामुळे 'मेघदूत' हे नाव खूप योग्य वाटलं  


 या पहिल्या वर्षी तुम्ही काय पाहिलं?
पहिल्या वर्षी आम्ही कोवलमपासून सुरुवात केली. कोवलमच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. तिथे आम्हाला काही मच्छीमार भेटले. पाऊस सुरू झाला की त्या क्षणाला यांचा रोजगार बंद झालेला असतो. ते हातांनी वल्हवायच्या बोटी नेत होते. उसळलेल्या समुद्रामध्ये त्यांना त्यांच्या या बोटी नेता येत नाहीत. त्यावेळी फक्त मोटर असलेल्या बोटीच समुद्रात जाऊ शकतात. याचबरोबर पावसाळा हा माशांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे ते दोन महिने तसंही मासेमारी करू शकत नाहीत. त्यामुळे पावसाचं आगमन त्यांच्या एकूणच रोजगारावर कुऱ्हाड आणणारं होतं. तिथून आम्ही साधारणत: ३०० किमी वर असणाऱ्या आलेप्पीमध्ये पोहोचतो. पाऊस तसाच कोसळत असतो. त्या समुद्रकिनारी एक छत्रीचं दुकान असतं आणि तो माणूस याच चार महिन्यांच्या काळामध्ये २० लाख छत्र्या विकतो आणि कोटय़वधी रु पये कमावतो. तर, एक पाऊस एकाच प्रदेशामध्ये एका माणसाचा रोजगार बुडवतो आहे तोच पाऊस दुसऱ्या एका माणसाला कोटय़धीश करत असतो. ही अशी विविधता आम्हाला प्रत्येक ठिकाणीच दिसत होती. 
थोडं आणखी पुढे आल्यावर अगुम्बेमध्ये आम्हाला खूपच वेगळं चित्र दिसलं. अगुम्बे हे खरंतर पावसाचं गावच म्हणायला हवं. कारण चेरापुंजीनंतरचा सर्वाधिक पाऊस इथे पडतो. इथे वार्षिक ७५०० मिमी पाऊस पडतो, अशी नोंद आहे. इथे डोंगराळ भाग आहे, त्यामुळे शेतीही होत नाही. इथे पर्यटनाचाही विकास झालेला नाही. इथल्या लोकांचं सरासरी वय ६० च्या पुढे आहे. इथे गावात करायला काही नाही. उद्योगधंदे नाही म्हणून इथला तरु ण बंगलोरला शिक्षणाला जातो आणि तिथेच स्थायिक होतो. आपण महाराष्ट्रात, पाऊस नाही म्हणून झालेलं स्थलांतर अनुभवत असतो, इथे आम्ही पाऊस अधिक आहे म्हणून होत असलेलं स्थलांतर पाहात होतो. पावसाच्या विविधतेचं, त्याच्या विविधतेच्या परिणामांचं हे दुसरं उदाहरण. 
आम्ही तेव्हा ज्या भागात फिरत होतो तो भाग, म्हणजे केरळ राज्य हे संपूर्ण पावसाचं साम्राज्य असलेलं राज्य आहे. आलेप्पीच्या बॅक वॉटर्समध्ये मध्ये काही शतकांपूर्वी भराव टाकून लोकांनी आपली घरं बांधली होती आणि काही अशी क्षेत्र तयार करून घेतली होती. एक भाग पाण्याचा ठेवायचा आणि त्याच्या आजूबाजूला भराव टाकायचा. पाणी काढून घ्यायचं त्यात भात शेती करायची. परत जेव्हा हवं तेव्हा त्या बॅक वॉटर्समधून पाणी आत सोडायचं. वर्षभरात असं ते तीन वेळा पीक घेतात. इथे सर्वात जास्त प्रतिहेक्टर तांदळाचं पीक घेतलं जातं. म्हणूनच त्याला तांदळाचं कोठार म्हटलं जातं. या अशाच एका कुट्टनाड नावाच्या गावात आम्ही गेलो होतो. तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे वर्षभर पाणी आहेच. पण पाऊस आला की इथली पाण्याची पतळी आणखीनच वाढते आणि इथली पूररेषा ही इथल्या घरातून जाते. इथले लोक जवळजवळ या पाण्यातच राहत असतात. ते चक्क काही फळकुट घालून त्यावर राहतात आणि त्याच्या खाली पाणी असतं. आपल्याकडच्या पुराचं आणि इथल्या पुराचं चित्र केवढं वेगळं आहे.


 तिथे अनुभवलेल्या पावसाच्या अनुभवाबद्दल सांग ना..
आम्ही कालिकतमध्ये होतो. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार इथे ऑफशोअर ट्रफ निर्माण होत होता. त्या क्षणाला आम्हाला कळालं की म्हणजे  काय. कमाल चित्र बघायला मिळालं आम्हाला. सगळे ढग हे समुद्रावर जमा झालेले आहेत आणि सगळ्या लाटा या ढगांच्या दिशेने अक्षरश: उफाळत आहेत. प्रचंड प्रचंड गडगडाट. आणि एकदम सुरू झालेला मुसळधार पाऊस. यामध्ये ढग आणि समुद्र एकमेकांमध्ये एकरूप झालेला आहे. त्यात प्रचंड पाऊस कोसळतो आहे. या सगळ्यामधून एक प्रचंड ऊर्जा आम्हाला जाणवत होती. प्रचंड ऊर्जा.. खूपच भारावून टाकणारं हे सगळं चित्र होतं. पण, हेच ढग जेव्हा एखाद्या मानवी वस्तीवर कोसळायला लागतात त्या वेळेला त्याचा वेगळाच परिणाम दिसायला लागतो. जोपर्यंत या सगळ्या ऊर्जेची आपल्याशी थेट संबंध नसतो तेव्हा एक दृश्य म्हणून, एक घटना म्हणून आपण हवामानशास्त्रीयदृष्टय़ा हे बघू शकतो. पण जेव्हा संबंध येतो तेव्हा सगळा हाहाकार दिसू लागतो.
'प्रोजेक्ट मेघदूत'बरोबर येणारा प्रत्येक जण- त्याच्यासाठी हा पावसाळा खूप वेगळा होता हेच सांगत असतो. आपण आपल्या घराच्या खिडकीतून अनुभवतो तो पाऊस किंवा अगदी घराच्या गच्चीमधून दिसणारं पावसाचं चित्र म्हणजे छत्री घेऊन जाणारे लोक, हातात चहाचा कप घेऊन पाऊस बघणारे एखादे काका किंवा आपल्या दुचाकीवरून भिजत काढलेली पावसाळी सहल यापलीकडे नाही. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जमिनीवर उभे राहून पाऊस अनुभवता, तेव्हा त्या अनुभवाची तीव्रता खूपच जास्त असते. म्हणजे कल्पना करा, आपण एखाद्या शेतात आहोत. एकाएकी पाऊस पडायला लागला आहे, समोर भात लागवड सुरू आहे. आपण रेनकोट घातला आहे, पण तरीही संपूर्ण भिजतो आहोत. ही तीव्रता खूप काही गोष्टी शिकवणारी असते.


 दुसऱ्या वर्षी तुम्ही कोणत्या भागात फिरलात?
पुढच्या वर्षीची थीम आधीच ठरलेली होती. आम्ही मेघदूताच्या काव्यामध्ये त्या यक्षाने मेघदूताला सांगितलेल्या वाटेने फिरणार होतो. तो मार्ग म्हणजे रामटेकपासून ते कुरुक्षेत्रापर्यंत, नंतर हिमालयातल्या अलकानगरी या काल्पिनक शहरापर्यंत, जी हिमालयात आहे असं सांगण्यात येतं. हा सगळा भाग सांस्कृतिकदृष्टय़ाही खूप महत्त्वाचा आहे. इथे काही प्राचीन मंदिरं आहेत. इथे काही महत्त्वाच्या राजवटी होऊन गेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या भागाच्या उत्कर्षांत पावसाचा कसा संबंध आहे हे आम्हाला पाहायचं होतं. यामध्ये पावसाविषयी लोकांमध्ये पारंपरिक ज्ञान काही जतन झालं आहे का, ते काय आहे, अशीही उत्सुकता आम्हाला होती.
मागच्या वर्षीचा आमचा प्रवास ३० जूनला सुरू झाला. नंतर आम्ही रामटेकमधल्या नागार्धन किल्ल्याजवळ पोचलो. याच किल्ल्यात बसून कालिदासाने आपले महाकाव्य लिहिलं आहे असं मानलं जातं. मग पचमढीचा भाग येतो. मग तिथून विदिशा शहर येतं, मग दशपूर, त्यानंतर कुरु क्षेत्र असं येतं.
१९९३मध्ये डॉ. एस.व्ही भावे यांनी त्यांच्या चार्टर विमानातून या मार्गाचे निरीक्षण केले होते. त्या वेळेस त्यांनी निसर्गाच्या, तिथल्या भौगोलिक परिस्थितीच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. परंतु त्यांना हवामानाचा सखोल अभ्यास करता आला नव्हता. या वर्षी आम्ही बारा जणांनी मध्य भारत पालथा घातला.
इथे पेंचच्या जंगलाशी, तिकडच्या गोंड आदिवासींशी आम्ही संवाद साधला. पाऊस यायला उशीर झाला होता. गटाचे दोन भाग करून हे किल्लारी आणि फुलझरी या दोन गावांमध्ये आम्ही फिरलो. फुलझरी हे गाव जंगलाच्या बरंच आतमध्ये आहे. हे सुरक्षित जंगलाच्या हद्दीत येत असल्याने लवकरच विस्थापित होणार आहे. आदल्याच आठवडय़ामध्ये हलका पाऊस पडून गेल्याने पेरणी सुरू झाली होती. पण नंतर पाऊस थांबल्याने त्यांची पेरणी वाया गेली होती आणि बरंच नुकसान झालं होतं. एकतर शिक्षण अगदी कमी, फुलझरीमध्ये पंचाग बघून पावसाचा अंदाज बांधायला मदत करण्यासाठी कोणी ब्राह्मण नव्हता, गावात वीज नसल्याने हवामान केंद्राकडून काही बातमी मिळणं अशक्यच होतं. कोणाला विचारायला जावं तर जवळचं गाव ४ ते ५ कि.मी. वर होतं. या सगळ्या कारणांमुळे त्यांचं हे नुकसान झालं होतं. दुर्दैवाने हीच परिस्थिती आज भारतात अनेक गावांची आहे. पावसाचं योग्य निदान न झाल्याने शेकडो लोकं गरिबीतून अतिगरिबीकडे वाटचाल करत आहेत. केवळ योग्य माहिती त्याच्यापर्यंत पोहचू शकत नाही या एका कारणाने.
याउलट किल्लारी हे गाव तसं मुख्य प्रवाहातलं होतं. वन अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असलेलं असं होतं. आमच्याशी बोलताना त्यांनी पावसाचे अनुभव अतिशय व्यवस्थित सांगितले. पाऊस आणि पीक चांगलं येण्यासाठी त्यांच्याकडे ते एक 'सैला' नावाचं नृत्य करतात. साधारण पावसाच्या सुरुवातीला गुजराती गरबाशी साधम्र्य असलेला हा नाच या गावातले लोक देवासमोर सादर करतात. हा सोहळा एकदा रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीला त्यांनी जेव्हा एक पाऊस पडला होता त्या सुमारास केला होता. पण त्यानंतर पाऊस एकदम गायब झाला होता. प्रोजेक्ट मेघदूताचा गट तिथे असताना गुरुपौर्णिमा होती. गुरु पौर्णिमा हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा सण. तेव्हा पुन्हा एकदा ते हा सोहळा करणार होते. आपल्या गटाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा 'सैला' नावाचा सोहळा संध्याकाळी गटासमोर सादर केला. 


 तू इथे पारंपरिक ज्ञानाबद्दल बोलतो आहेस, त्याबद्दल तुम्ही कोणाशी बोललात का?
या दुसऱ्या वर्षीच्या प्रवासादरम्यान आम्हाला या विषयी खूप माहिती मिळू शकली. उदाहरण द्यायचं झालं तर चित्रकूटचं देता येईल. या भागात पारंपरिक ज्ञानाचा वापर करून नानाजी देशमुखांनी इथल्या गावांमध्ये काही पर्यावरणपूरक प्रकल्प उभे केले आहेत. आता इथलं काम भरत पाठक पाहतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या भागात घाग, बंदरी किंवा बड्डरी नावाचे दोन कवी मोघलांच्या काळात होऊन गेले. त्यांचा हवामान शास्त्राचा अभ्यास दांडगा होता. त्यांनी सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत म्हणी रचल्या. या म्हणी इथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. या म्हणींमध्ये पावसाबद्दलचं ज्ञान लपलेलं आहे. कोणत्या नक्षत्रात कसा पाऊस, दुष्काळ, पीक-पेरणीबद्दलचं हे मौखिक ज्ञान इथल्या शेतकऱ्यांचं तयार आहे. ते त्यांच्या रोजच्या वापरात या म्हणी वापरत असतात.
यानंतर आम्हाला खजुराहोच्या रस्त्यावर आपल्याकडे जो मृगाचा किडा हा पावसाळा सुरू होण्याआधी दिसतो तोही इथे दिसला. इथे त्याला लाल गाय असं म्हणतात. तिथेच म्हणजे सागर आणि छतरपूर जिल्ह्याच्या मध्ये एक शेतकरी भेटला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेली दहा वर्षे अत्यंत कमी पाऊस पडल्याने पीक बदललं गेलं होतं. दहा वर्षांपूर्वी इथे खूप पाणी लागणारं भाताचं पीक घेतलं जायचं. त्याचबरोबर अजून एका शेतकऱ्याने जांभूळ, कडुलिंब आणि बोर या तीन झाडांची फळं पडायला लागणं हे पावसाचं चिन्ह असल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलेली आणखी चिन्हे ही त्या घाग-बड्डरीच्या म्हणींशी मिळतीजुळती होती.
मध्य भारताच्या या प्रवासात आम्हाला सगळीकडे सामान्य लोकांचे अंदाज खरे ठरताना दिसत होते. काही परंपरा आणि पाऊस या गोष्टी अनेक वर्षे सतत जुळून आल्याने स्थानिकांचा त्या रूढींवरचा विश्वास दृढ होत होता. पंचांगात सांगितल्याप्रमाणे पाऊस उशिरा आणि नेहमीपेक्षा कमी हे समोरच दिसत होतं. त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवताना हे पारंपरिक ज्ञान, ठोकताळे आणि हवामान खात्याचे अंदाज याचं गणित कसं मांडायचं हा मोठा प्रश्न आम्हाला पडला होता.


 'मेघदूत' आणि मॉन्सूनचा मार्ग याचा संबंध तू कसा लावशील?
'मेघदूता'च्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या काव्यामधल्या श्लोकानुसार जात होतो. त्या प्रत्येक ठिकाणी तो श्लोक जसातसा आम्हाला अनुभवता येत होता. प्रवासाची सुरुवात रामटेकपासून होते. कालिदासाला तो मेघ रामगिरीच्या पर्वतावर उतरलेला दिसतो आणि तो त्याला तिथून उत्तर दिशेला जायला सांगतो. उत्तरेला दशार्ण देशाकडे तो त्या मेघाला जायला सांगतो. हा भाग आत्ताच्या छत्तीसगढम्मध्ये येतो. मग पश्चिमेला वळून पेंच अभयारण्य लागतं आणि नंतर पचमढी लागतं. कालिदासाने पचमढीला आम्रकूट असं म्हटलं आहे. या भागात कालिदासाने त्या मेघाला 'रेंगाळू नकोस आणि पुढे उत्तरेला जात राहा' असा सल्लाही दिला आहे. या आम्रकूटमध्ये वर्णन केल्याप्रमाणे आज १६०० वर्षांंनीसुद्धा इथे गावठी आंब्यांची बरीच झाडं दिसतात आणि इथल्या पचमढीच्या पायथ्याच्या 'बरीआम' या गावात आंबा मोठय़ा प्रमाणात विकलाही जातो.
यानंतर तो त्या मेघाला आणखी पुढे जायला सांगतो आणि त्याला एका महादेव पर्वतावर विसावा घ्यायला सांगतो. या ठिकाणी विसावा घेताना तुला 'पृथ्वीचे स्तन' दिसून येतील असंही सांगतो आणि त्याप्रमाणे खरंच आपल्याला तो पर्वत दिसतो, त्या पर्वतावर उतरून आलेले ढग दिसतात आणि समोर दोन डोंगरही दिसतात, ज्यांचा आकार स्तनांसारखा वाटू शकतो. आजही या परिसरातली भौगोलिक परिस्थिती बदललेली नाही.


 या वर्षी या प्रकल्पाचा तिसरा टप्पा आहे, कुठे जाऊन आलात तुम्ही?
या वर्षी आम्ही पश्चिम भारतात फिरलो. हा भाग सगळाच कमी पावसाचा प्रदेश आहे. इथे पाऊस सगळ्यात उशिरा पोचतो आणि कमी काळ राहतो. त्यामुळे अशा प्रदेशामधल्या लोकांची पावसाची पाण्याची गरज, ते काही पाणी वापराच्या वेगळ्या पद्धती पाळतात का? असा सगळा अभ्यास आम्हाला करायचा होता. त्याबरोबरच आपण कायम ऐकत आलो आहोत की या प्रदेशातली सरस्वती नदी लुप्त झाली, त्या नदीविषयी माहितीही आम्हाला मिळवायची होती.
या प्रवासात जेव्हा आम्ही हरियाणामध्ये फिरत होतो तेव्हा आमचा बऱ्यापैकी अपेक्षाभंगच झाला. हरियाणामधल्या प्रत्येक गावात एक तळं आहे. अनेक तळी ही पुरातनकालीन आहेत. पण आज तिथली लोकं त्यांचा सुयोग्य वापर करताना दिसत नाहीत. हा सगळा प्रदेश हरित क्रांतीमुळे हिरवा झालेला. सगळीकडे कालव्यांचं जाळं. पण तरीही इथल्या भूजलाची पातळी प्रत्येक वर्षी कमी होताना दिसते आहे. पाणी ३00 ते  ४00 तर काही ठिकाणी ६00 फुटावर लागत आहे. इथले लोक हे ठिकठिकाणी बोअरवेल्स खणून भातशेती करताना दिसतात. ज्या भागात केवळ सहा महिनेच शेती करणं बंधनकारक आहे तिथे अशाच भूजलाच्या आधारे आणि हव्यासापोटी बाराही महिने शेती होताना दिसते. इथल्या माणसाचा पावसाशी संबंध फार कमी, कारण पाऊस नसला तरी त्यांना हिमालयाच्या नद्यांमधून पाणी मिळत असतं. म्हणून पाऊस आला की तेवढय़ापुरतं त्याचं पंपाचं बिल कमी होतं तेवढाच काय तो यांचा पावसाशी संबंध. त्यांना पाऊस महत्त्वाचा नसून पाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा सगळा भाग हे भारताचं धान्याचं कोठार आहे, हे जरी मान्य असलं तरी ते कशाच्या किमतीत याची जाणीव आपण ठेवायला हवी असं मला वाटतं.
या सगळ्या प्रवासामध्ये असं एक प्रकर्षांने जाणवलं की माणसाचा आणि पावसाचा संबंध खूप कमी झाला आहे. माणसं पावसापासून लांब गेली आहेत. एक तर आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाणी उपलब्ध केलं आहे. मग ते धरणाने असो किंवा बोअरने. त्यामुळे आता पडणारा पाऊसच आपण वापरायचा आहे हे बंधन आपल्यावर नाही. ते पावसाचं पाणी कोणीतरी साठवेल आणि ते आपल्या घरापर्यंत येईल अशी खात्री आपल्याला आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांचा जो पावसाकडे बघायचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे तो या खात्रीमुळे. नळाला पाणी नाही आलं तरी आपण टँकर मागवू. भले आपल्याला त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. पण पाणी नक्की मिळेल. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य, त्यात शहरी पावसाकडे एक नैसर्गिक संसाधन म्हणून पाहात नाहीयेत. त्यामुळे आपण आपलं पाणी साठवावं ही भावना कमी आहे आणि एका प्रकारे या संसाधनाला गृहीत धरलं जातंय असं मला वाटतंय.


 गेली तीन र्वष हा प्रवास आणि संशोधन सुरू आहे. कोणकोण आहे तुझ्याबरोबर?
गेल्या तीन वर्षांंत आतापर्यंत आम्ही, २५,००० किलोमीटर्सपेक्षा जास्त प्रवास केला आहे. यामध्ये पश्चिम घाट, मध्य भारत आणि वायव्य भारत यांचा समावेश आहे. त्यालाच धरून महाराष्ट्रात केलेला प्रवास आहे. यामध्ये आजपर्यंत चाळीसपेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. यातले सर्वजण २० ते ३० या वयोगटातले आहेत. यातले बरेचसे शास्त्र विषयाचे आहेत. काही हवामानशास्त्र शिकत आहेत, काही जैवविविधतेमध्ये अभ्यास करत आहेत. बरेचसे झुऑलॉजी, बॉटनी या विषयांचा अभ्यास करत आहेत. काही समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत, कलाकार आहेत. पत्रकार तर आहेतच. फोटोग्राफर्स आहेत आणि दरवर्षी याची संख्या वाढतेच आहे. आजही दिवसाला एखादा तरी मेल मला येतो की मला उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं आहे, कसं होऊ, असं विचारणारा. या सगळ्या प्रकल्पाला माध्यमांनीही चांगली साथ दिली आहे.


 आणि या सगळ्याचं आर्थिक गणित?
सध्या या सगळ्या प्रकल्पाचं स्वरूप स्वयंसेवी आहे. 'प्रोजेक्ट मेघदूत'मध्ये सहभागी होतो तो प्रत्येक जण त्याच्या प्रवासाचा खर्च उचलतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नाहीये किंवा अशी मदत मिळाली म्हणून आम्ही हा प्रकल्प करतो आहोत असं नाहीये. मी व्यक्तिगत यामध्ये दीड ते दोन लाख रु पये खर्च केले असतील. यामध्ये दरवर्षी सहभागी होणारेही त्यांना त्या विषयाची ओढ वाटते म्हणून, आणि पावसाचा अभ्यास व्हायला हवा आहे अशी त्यांची इच्छा असते म्हणून वर्षभर पैसे साठवून ठेवतात आणि या प्रकल्पात सहभागी होतात. प्रत्येक वेळी आम्ही प्रवासाच्या शेवटी जेव्हा मीटिंग घेतो तेव्हा प्रत्येकाच्याच 
बोलण्यात असं येतं की या पावसाने त्यांना अभ्यासक म्हणून,  माणूस म्हणून नक्कीच समृद्ध केलं आहे.


 आता या प्रकल्पाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढची योजना काय आहे?
पुढच्या वर्षी आम्ही अंदमान आणि उत्तर-पूर्व भारत पार करणार आहोत. यातला बराचसा भाग बोटीनेही असणार आहे. त्याच्या पुढच्या वर्षी बिहार, उत्तर-प्रदेश आणि हिमालय, म्हणजे काश्मीरपर्यंत असेल. याच वर्षी परतीचा मान्सूनही अनुभवायचा असं आम्ही ठरवलं आहे. म्हणजे भारताचा पूर्व तट पार करून रामेश्वरपर्यंत येऊन हा प्रवास संपेल.

हा प्रवास झाल्यावरच खरं काम सुरू होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिळालेल्या माहितीचं संकलन करून या सर्व माहितीचा मॉन्सून एन्सायक्लोपीडिया सर्वांसमोर आणणं हे 'प्रोजेक्ट मेघदूत'चं यापुढचं उद्दिष्ट आहे. या एन्सायक्लोपीडियासाठी सर्व भागांमधल्या छोटय़ा छोटय़ा गटांनी तिकडच्या हवामानाची आणि पावसासंबंधी इतर माहिती गोळा करून आमच्यापर्यंत पोहोचवणं हा मोठा भाग पार पडणं अपेक्षित आहे. यात जेवढा लोकसहभाग वाढेल तेवढं हे ज्ञान विस्तृत होत जाईल. म्हणून आम्ही ज्या ज्या भागात जातो त्या भागातले स्थानिक पत्रकार, विद्यार्थी-प्राध्यापक यांना बरोबर घेतो आणि त्यांना त्यांच्या भागाचा पावसाबद्दलचा अनुभव विचारतो आणि त्यांनाही काही आकडेवारी आणि इतर स्थानिक माहिती जमा करायला सांगतो. याने ते प्रकल्पाशी जोडले जातात आणि आपलं सर्वांचं एकत्रित ज्ञान समृद्ध होत राहतं. आम्ही जिथे जिथे जातो, तिथे आम्हाला पावसाबद्दलचं स्थानिक ज्ञान सांगणारे जे जे भेटतात ते सगळे साठी-सत्तरीच्या पुढचेच असतात. जसजशी वर्षे जातील तसं हे पारंपरिक ज्ञानही संपत जाईल अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे आमच्यासाठी हा मान्सून एन्सायक्लोपीडिया लवकरात लवकर तयार होणं अतिशय महत्त्वाचं आहे