सोमवार, ८ जुलै, २०१३

मॉन्सून डायरी: ५ जुलै २०१३

आज (दि ९ जुलै, २०१३) आषाढाच्या पहिल्या रामगिरी पर्वतावर उतरलेला मेघदूत नक्कीच पहिला नाही. त्याच्या भाऊबंदांनी महिनाभर आधीच मध्य भारताला ओलांडून उत्तरेकडे आगेकूच केलेली. असे वाटते की यंदा मेघदूताला कोणाचाही संदेश ऐकून घ्यायला वेळच नव्हता की काय.. उत्तरेकडे जाणारा मार्ग त्याच्या अगदीच परिचयाचा. सोळा दिवसात त्याने कोवलमच्या किनाऱ्यापासून सिंधूच्या पात्रापर्यंतचा प्रवास हा हा म्हणता पूर्ण केला.. मध्य भारतानंतर पश्चिम- वायव्य भारतात मॉन्सून सर्वात शेवटी म्हणजे सर्व साधारणपणे जुलैच्या मध्यात पोचतो. ते लक्षात घेऊन यंदाच्या प्रोजेक्ट मेघदूतच्या प्रवासाचा कालावधी जुलैचा पहिला- दुसरा आठवडा निश्चित केला होता. पण १६ जूनलाच त्याने संपूर्ण भारत व्यापल्यामुळे यंदा पाठलाग शक्य झाला नाही.. पण त्याच्या उपस्थितीत प्रवास मात्र सुरु झाला. 

५ जुलै २०१३   

१० जूनला आगुम्बे ते म्हसवड प्रवास करून प्रोजेक्ट मेघदूतच्या तिसऱ्या सिझनचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतरचे २० दिवस त्या प्रवासावर आधारीत अभ्यास प्रकल्प मार्गी लावणे, मिळालेल्या निरीक्षणांचा शास्त्रज्ञांच्या, तज्ञांच्या मदतीने अर्थ लावणे, मिटींग्स, पुढच्या टप्प्याची तयारी, पुस्तकांची, रेफ़ेरन्स पेपरची जमवाजमव, मुलाखती यांत गेले. लिखाणाला वेळ मिळाला नाही.. त्या टप्प्यावरील लेख अजूनही अर्धवटच आहे. पहिल्या टप्प्यात १५ जणांचा सहभाग होता. आणि दुसरा टप्पा १५ दिवसांचा असल्यामुळे त्यांच्यापैकी कोणालाही या टप्प्यात सहभागी होणे शक्य नव्हते. तेव्हा एकट्याने हा प्रवास करायचे निश्चित केले. मात्र अगदी निघायच्या दोन दिवस आधी हो नाही म्हणता म्हणता मंदारचे निश्चित झाले आणि तो ४ जुलैला अमरावतीहून पुण्यात पोचला. तो पुण्यात पोचल्यावर आता प्रवास सुरु होईल असं वाटलं, पण पुढे गाडीचे प्रश्न.. शेवटी दोन दिवस पूर्ण गाडीचा प्रश्न मार्गी लावण्यात गेला आणि ५ च्या रात्री ८ ला अखेर प्रोजेक्ट मेघदूतच्या तिसऱ्या सिझनच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी, मंदार आणि गणेश सोनावणे (ड्रायव्हर) तिघे मॉन्सूनसोबत पाच हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघालो.   

एक एसएलआर, एक हैन्डी कॅम, एक सायबरशॉट, वेदर इन्सट्रूमेंट्स, जीपीएस, तीन लैपटॉप, १५०० जीबीच्या हार्डडिस्कस, २०- २५ रेफरन्स बुक्स, सगळ्या भागांचे नकाशे, अभ्यासाशी संबंधित सर्व विषयांचे रेफरन्स पेपर्स, स्थानिक तज्ञ, पत्रकारांचे नंबर्स आणि महत्वाचं म्हणजे प्रवासासाठी आवश्यक 'अर्थव्यवस्था' सोबत होती. 

यंदाच्या प्रवासाचे मुख्य उद्दीष्ट्य म्हणजे हरयाणा, पंजाब या हिमालयातील नद्यांवर आधारीत राज्यांतील पावसाचा अभ्यास, तसेच देशातील सर्वात कमी पाऊस पाऊस असणाऱ्या राजस्थान आणि गुजरातच्या वाळवंटी भागातील पावसाचा, त्याच्या परिणामांचा आणि पावसाचा त्या भागाशी असलेल्या नात्याचा शोध घेणे हे आहे. याच भागांत देशातील सर्वात जुन्या मानल्या जाणाऱ्या आर्कीओलॉजीकल साईटस असल्यामुळे इतिहासातील या भागांचे महत्व अधोरेखित होते. मग या भागातील संस्कृतीचा ऱ्हास का झाला? त्या मागे 'पाऊस' हेही एक कारण असू शकेल का, असेही प्रश्न सतावत होते. तेव्हाच सरस्वती नदीवर प्रसिद्ध झालेले एक आंतरराष्ट्रीय संशोधन वाचनात आले, ज्यामध्ये ईस पूर्व ३९०० ते ३५०० या कालावधीत पश्चिम भारतातून मॉन्सून पूर्वेकडे सरकला आणि त्यातून सरस्वतीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या कोरड्या पडल्या परिणामतः सरस्वतीचे मध्यापासून अरबी समुद्रापर्यंतचे पात्र कोरडे पडले असे लिहिले होते. हे जर खरे मानले तर कदाचित या भागातील भूगोल आणि इतिहासही मॉन्सूनसोबत कालानुरूप कसा बदलत गेला हेही लक्षात येऊ शकते. तेव्हा या प्रवासात लुप्त प्राचीन सरस्वतीचा धागा पकडून अभ्यास करण्याचे आम्ही निश्चित केले. ते संशोधन परिपूर्ण नाही असे मानले तरी, नवीन काही तथ्येही हाती लागण्याची शक्यता असल्यामुळे यंदा मॉन्सून सोबतच्या प्रवासाचा मार्ग सरस्वतीच्या खोऱ्यातून आखला.

सुरुवातीला दिल्लीला पोहचून काही पत्रकार, तज्ञांच्या मुलाखती घेऊन मग हरयाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात अशा मार्गाने पुढील प्रवासाची योजना केली. पुण्यातून निघालो तेव्हा मॉन्सूनचा सर्वदूर पाऊस थांबून थंडरशोवर्स सुरु झाले होते. आयएमडीच्या बुलेटीनमध्ये मध्य भारत आणि हरयाणात काही ठिकाणी पाऊस सुरु असल्याचे दिसले. गाडी महाराष्ट्रात असेपर्यंत एक दोन तुरळक सरी रस्ते ओले करून गेल्या.. खिडकीतून बाहेर आकाशात नजर गेली तेव्हा काळ्या स्वच्छ आकाशात खूप दिवसांनी तारेही दिसले. मध्य प्रदेशात प्रवेश केला तेव्हा ढगांआडून आकाशाचा रंग बदलू लागला.


शुक्रवार, ५ जुलै, २०१३

प्रोजेक्ट मेघदूत- सिझन ३

गेल्या वर्षी १० जुलैला मेघदूताचा उज्जैनमधून निरोप घेऊन पुण्याला परतलो होतो. उज्जैनच्या महाकाल मंदिरात संध्याकाळच्या आरतीला आपल्या धीरगंभीर स्वरांनी साथ देणारा मेघदूत उत्तरेकडे मार्गस्थ होताना गम्भिरा नदीच्या सौंदर्यात थोडा वेळ रेंगाळतो.. मेघदूत गम्भिराच्या मिलनाची दृश्ये टिपून आता आमचा मेघदूतासोबतचा पुढील प्रवास सुरु होणार आहे. चंबळच्या खोऱ्यात घोंघावून मेघदूत अरवली पर्वताला धडक देईल.. पुढे क्षत्रियांच्या रक्ताने पावन झालेल्या कुरुक्षेत्रात प्रवेश करून प्राचीन सरस्वतीचे जलप्राशन करेल आणि आमचा निरोप घेईल.. इथून मेघदूत आणि आमचा विरुद्ध दिशांनी प्रवास सुरु होईल. मेघदूत स्वतः जरी यक्षाने सांगितलेल्या मार्गाने हिमालयाकडे मार्गस्थ होणार असला, तरी त्याने दर्शन घडवलेल्या सरस्वतीच्या मार्गावरील खंडीत पात्रांत आम्हाला त्याचे प्रतिबिंब ठिकठिकाणी दिसेल. 
आज रात्री ८ ला प्रोजेक्ट मेघदूतच्या तिसऱ्या सिझनची सुरुवात होत आहे. मंदार मोरोणे आणि मयुरेश प्रभुणे (दोघेही पत्रकार).. आम्ही दोघे पुढील १५ दिवस प्राचीन सरस्वती नदीच्या खोऱ्यातून मॉन्सूनचा अभ्यास करणार आहोत. प्रवासातील अपडेटस आणि फोटो नियमित अपलोड करूच..  
(५ जुलै २०१३, पुणे)